भारत देशावर अनेकवेळा परकीय आक्रमण झालेत आणी येथील धर्म आणी संस्कृतिवर मोठे संकट व्यापले गेले. हिन्दू धर्मासोबतच इतर जातिधर्मांचेही अतुलनीय असे नुकसान झाले. देशावर परकीय शासक अनेक शतकं राजपाट करीत गेले आणी याभूमितील संतान गुलामगिरित सापडली. अशा वेळी सतराव्या शतकात शीख धर्माचे नववे गुरु श्री तेगबहादुर यांनी राष्ट्रातील धर्म आणी संस्कृतीच्या रक्षणार्थ व्यापक अशी जनजागरूकता केली. तर काश्मीरी पण्डितांचे धर्म वाचवण्यासाठी गुरु तेगबहादुर यांनी स्वतःचे बलिदान दिले. जगात अशा प्रकारच्या बलिदानाचा इतिहास इतत्र कुठे सापडणे शक्यच नाही.
गुरु तेगबहादुर यांचे जन्म 21 एप्रिल सन 1621 रोजी अमृतसर येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोबिंद साहिब (सहावे गुरु) आणी आईंचे नाव नानकी असे होते. त्यांचे वास्तविक नाव त्यागमल ठेवण्यात आले होते. पण तेरा वर्ष वय असतांना त्यांनी मोघलाविरोधात युद्धात सहभाग घेतला आणी पराक्रम गाजवत विजय मिळवला. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना “तेगबहादर” अशी पदवी बहाल केली. “तेग” शब्दाचा अर्थ तलवार असा होतो. त्यांना “तेग” चा धनी म्हणून उपाधि दिली गेली.
गुरूजी यांनी बालपणीच शिक्षणासोबतच शस्त्रविद्या आत्मसात करायला सुरुवात केली. त्यांनी धार्मिक शिक्षणावरही भर दिले. त्यांनी रचलेल्या वाणीतील 116 शबद (श्लोक) श्री गुरु ग्रंथसाहेब मध्ये समाविष्ट आहेत. पुढे चालून सन 1665 मध्ये त्यांना शीख धर्माचे नववे गुरु म्हणून पद मिळाले. सतत दहा वर्षें त्यांनी धर्मप्रचार आणी धर्म विस्ताराचे उल्लेखनीय असे कार्य केले. त्यांनी आनंदपुर साहेब या शहराची रचना नव्याने केली आणी त्याठिकाणी शिक्षण, साहित्य, कला, संस्कृति आणी व्यापार क्षेत्र निर्माण केली. याच ठिकाणी गुरुजींनी त्यांचे सुपुत्र आणी शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांना गुरुगादी प्रदान केली.
गुरु गोबिंदसिंघजी यांचे वय नऊ वर्ष असतांना आनंदपुर साहेब येथे कश्मीरी पण्डितांचे एक शिष्टमंडळ गुरु तेगबहादुर यांच्या भेटीसाठी पोहचले होते. त्या शिष्टमंडळाने गुरूजीपुढे कैफियत मांडली की मोघल बादशाह औरंगजेब यांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अंतिम मुद्दत दिलेली आहे. आमचे धर्म संकटात सापडले आहे. पुढे इतर कोणताच मार्ग शेष नाही. वरील प्रकार ऐकून गुरु तेगबहादुर हे चिंतेत सापडले. तिथे जवळच खेळत असलेले गुरु गोबिंदसिंघजी वडिलाजवळ आले आणी त्यांच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा गुरु तेगबहादुर म्हणाले, हिन्दू धर्मावर संकट व्यापले गेले आहे.
या संकटातून मुक्त होण्यासाठी एका महान व्यक्तिच्या बलिदानाची गरज आहे. वडिलांचे बोल ऐकून बाल गोबिंदसिंघ चटकन म्हणाले, या भूमीवर आपल्या पेक्षा महान व्यक्ति दूसरा कोण आहे? गुरु तेगबहादुर यांनी आपल्या पुत्रास जवळ घेऊन मीठी मारली आणी कश्मीरी पण्डितांना उद्देशुन म्हणाले, औरंगजेबला माझा निरोप दया की “जर गुरु तेगबहादुर इस्लाम धर्म स्वीकार करेल, तर आम्ही सर्व हिन्दू इस्लाम धर्माचे अनुयायी होण्यास तयार आहेत.
औरंगजेब जवळ गुरुजींचा संदेश पोहचला आणी त्याने गुरुजींना अटक करण्याचे फरमाण काढले. काही महिन्यानंतर गुरु तेगबहादुर यांना आगरा शहरात धर्मप्रचारादरम्यान अटक झाली. त्यानंतर त्यांना औरंगजेब समोर पाचारित करण्यात आले.
गुरुजींनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले. पण गुरुजींनी स्पष्ट नकार दिला. गुरुजींना आणी त्यांच्या शिष्यांना मोठ्या यातना देण्यात आल्या. पण गुरुजींनी बलिदान करण्याचा आपला मानस दृढ असल्याचे सांगिलते. म्हणून दि. 24 नोव्हेंबर सन 1675 रोजी दिल्ली येथील चांदनीचौक समोर गुरुजींना शहीद करण्यात आले. तिथिनुसार दि. 30 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे गुरु तेगबहादुरजी यांचा शहीदी दिवस पाळण्यात येत आहे. या प्रसंगी गुरुजींच्या महान बलिदानास विनम्र अभिवादन.
रविंदर सिंघ मोदी, पत्रकार, नांदेड
9420654574