हिमायतनगर| पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भागातून एमएसईबी ऑफीस जवळ, सवना टी पॉईटवर असलेल्या शेतकऱ्याच्या आखाड्यावरून दि.24 नोव्हेंबर 2024 रोजीच्या सुमारास अज्ञातांनी तीन म्हशी चोरून नेल्याची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने हिमायतनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने म्हशी चोरी करून बाजारात विक्री केल्याचे कबुल केलं आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व मागील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.24.11.2024 रोजी 19.00 ते दि.25.11.2024 रोजी 04.00 रोजीच्या सुमारास फिर्यादी उत्तमराव धुळबाराव कोळेकर, हि.50 वर्ष, धंदा शेती, रा. लकडोबा चौक, हिमायतनगर जि. नांदेड, व साक्षीदार गोविंद उत्तम ढोणे, हिमायतनगर 35 वर्ष, धंदा शेती, रा. हिमायतनगर, जि. नांदेड यांच्या आखाड्यावर बांधलेल्या प्रत्येकी 30,000/- रु. किंमतीच्या 03 म्हैशी एकूण किंमत 90,000/- रु. ह्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्यादी दिली होती.

यावरून पोलिसांनी तक्रार दिल्याने गु.र.क्र. गु.र.क्र.283/2024 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना दि.25.12.2024 रोजी गुप्त खबऱ्याकडून इसम शेख सत्तार शेख आमीर, मु. 29 वर्ष, रा. मुर्तझा कॉलनी, हिमायतनगर, जि. नांदेड हा म्हैस चोरीच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची माहिती मिळाली. यावरून गुप्त बातमीदारकडून नमुद आरोपीच्या सर्व संभाव्य ठाव ठिकाणांबाबत आरोपीताचा माग काढीत अथक परिश्रम घेऊन आरोपी हा नई आबादी, हिमायतनगर येथे मिळून आल्याने त्याचेकडे कौशल्यपूर्वक सखोल तपास केला.

यावेळी त्याने नमूद गुन्हा हा 02 ABCD विधीसंघर्ष ग्रस्त बालकाच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपीतास दि.25.12.2024 रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपीताकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने नमुद गुन्ह्यातील चोरी केलेल्या 03 म्हैस नमुद 02 विधीसंघर्ष ग्रस्त बालकाच्या मदतीने कारंजा, वाशीम या ठिकाणी आठवडे बाजारात 90,000/- रु. किमतीस विक्री केल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने सदरची 90,000/- रु. रक्कम व गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH-26-BB-0332, कि.अं.4,00,000/- रु. अशी एकूण 4,90,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे, सपोउपनि कोमल कागणे, पोहवा/1272, श्याम नागरगोजे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या म्हशी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून केलेल्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकार्यांसह तालुक्यातील नागरीकातून अभिनंदन केले जात आहे.