नांदेड, अनिल मादसवार| सोयाबीनची उगवणच झाली नसल्याने फसवणूक (Soybeans did not germinate) झालेल्या शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठवून या प्रकरणात लक्ष घालून ‘इनोवेज १०८’ या सोयाबीन कंपनीवर आणि बालाजी कृषी सेवा केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करून टाळे ठोकण्यात यावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी बालाजी बाबुराव हेंद्रे रा. देळूब यांनी केली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येतील शेजारी बालाजी बाबुराव हेंद्रे रा. देळूब, ता अर्धापूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नांदेडच्या नवा मोंढा भागातील बालाजी कृषी सेवा केंद्रातून ३ जून २०२५ रोजी इनोवेज १०८ व उन्नती कंपनीच्या प्रत्येकी तीन सोयाबीन बॅगा खरेदी केल्या होत्या. चांगला पाऊस पडल्यानंतर २७ जून रोजी ३ एकर रानात इनोवेज १०८ च्या तीन आणि दुसऱ्या ३ एकर रानात उन्नत्ती कंपनीच्या तीन सोयाबीन बॅगांची पेरणी केली.

तीन-चार दिवसापासूनच ‘उन्नती’ च्या सोयाबीन वाणाची उगवण रानात झालेली दिसली. परंतु आठवडा उलटला तरी तीन एकर शेतात इनोवेज १०८ हे सोयाबीन वान उगवले नाही. यामुळे सरळ सरळ ही फसवणूक झाली असे दिसून येत असल्याचे म्हंटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून सोयाबीन कंपनीवर व संबंधित दुकानदारावर शेतकऱ्याची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कृषी सेवा केंद्र दुकानाला तातडीने टाळे ठोकावे आणि झालेल्या नुकसानी बद्दल न्याय मिळवून द्यावा असेही निवेदनात म्हंटले आहे.

तसेच अर्धापूर तालुक्यातील बालाजी हेंद्रे, चिमाबाई थोरात या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यामुळे बियाणे बोगस निघाले असल्याचा आरोप महिला व पुरुष शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधवार आलेल्या कृषी विभागच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आहेत.