सावित्रीबाई फुले म्हणजे आमच्या सांस्कृतिक महामाता. या देशातील तमाम दीन दलित अस्पृश्य शुद्रातिशुद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अर्थ शिकविणारी विश्वशिक्षिका. मेलेल्या कोट्यावधी देहांमध्ये प्राण फुंकणारी ही सावित्री म्हणजे सावित्रीमाई. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. ज्या महामातेला ज्या ज्योतिबांनं शिकवलं. धर्म नावाच्या क्रुर व्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाचं शस्र करुन उभं केलं.
अज्ञान अंधश्रद्धेच्या काळ्याकुट्ट दलदलीत पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या ज्यांचं जगणं जनावरांपेक्षाही हीनदीन होतं, अशांना उजेडाची वाट दाखवणारा महात्मा फुले. ते महात्मा नव्हेत तर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा अशी अपेक्षा न ठेवता आधी स्वतःच्या घरात क्रांतीची सावित्रीज्योत पेटवणारे ते क्रांतिबा. निव्वळ बोलके नव्हे तर कर्ते सुधारक क्रांतिबा ज्योतिबा फुले. या दांपत्याने मानवी जीवनाच्या प्रगतीचे महाद्वार ज्याने कायमस्वरूपी उघडते ती चावी उपेक्षित, वंचितांच्या हाती देऊन गावाबाहेरील वेशीचा पाया खिळखिळा केला. माणसातील पशुत्व हटविण्याच्या क्रांतिकारी प्रक्रियेत या विद्यामातेचे योगदान अतुलनीय असेच आहे. ज्यांनी शिक्षणानं सुसंस्कृत समाजाची पुनर्रचना केली. याबरोबरच समाजाला नव्या निर्माणाचा व्यापक आशय देणारी चळवळ उभी केली.
या चळवळीच्या भरभक्कम बांधणीचा आशय सावित्रीमाईंनी लिहिलेल्या काव्यफुले या काव्यसंग्रहात तो पदोपदी जाणवत राहतो. काव्यसंग्रहातील हरेक काव्य प्रकृती ही वसंततालिका, ओवी, स्रोत, अनुष्टुभ, अभंग, अष्टमात्री, पद्य, अक्षरछंद यात बंदिस्त असली तरी शब्दांची धार मात्र सनातन गुलामगिरीची दोरखंड कापून काढणारी बंधमुक्तीची कार्यकारी संसदच आहे. या चळवळीचा विश्वाध्यक्ष क्रांतिबा म्हणजे ज्योतिबांना साष्टांग दंडवत घालत म्हणतात… ज्योतिबांना नमस्कार/मनोभावे करतसे, ज्ञानामृत आम्हां देई/अशा जीवन देतेस, थोर ज्योति दीन शूद्रा/अतिशुद्रा हाक मारी, ज्ञान ही इर्षा देई/तो आम्हाला उद्धरी. या त्यांच्या ओळी स्रीयांसह शुद्रातिशुद्रांना ज्ञानामृत पाजणाऱ्या, उद्धार करणाऱ्या ज्योतिबांच्या पायांवर लोळण घेणाऱ्या आहेत.
सावित्रीमाईंचे ज्योतिबांवरचे निस्सीम प्रेम व्यक्त करणारा अभंगही फुलेंच्या काव्यात लिपीबद्ध झाला आहे. सावित्रीमाईंच्या जीवनात ज्योतिबा स्वानंद देणारे कळीतला मकरंद ठरले आहेत. या सुखाच्या संसारात एक फूल गुलाबाचे तर एक फूल कण्हेरीचे असले तरी दोघांचे स्वरूप एकजीव होते. या सुखी संसाराचे दुखणे मात्र वेगळेच होते. त्यांच्या भोवतीचे दोन हजार वर्षांचे शुद्रांच्या हाल अपेष्टांचे दुखणे काटे बनून टोचत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी शुद्रातिशुद्रांना एक विचार दिला. शुद्रांना सांगण्या जोगा/आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने पशुत्व हाटते पहा. परंतु माणसात हे पशुत्व असे आले? का आले? हा आजच्या काळातही गंभिरपणाने चिंतन करण्याचा विषय आहे.
कारण शुद्रच ही परंपरेने चालत आलेली अवस्था आहे असे मानत असत. कारण मनू महाराजांनी हे समस्तांंवर बिंबवले आहे. मनू म्हणे ही ओवी गातांना माई म्हणतात, शुद्र जन्म घेती/पुर्वीची पापे ती, जन्मी या फेडती/शुद्र सारे..विषम रचती/ समाजाची रीती, धूर्ताची नीती/अमानव! मनू म्हणत असल्यामुळे शुद्रांनीही असे मानावे की आजची आमची पशुहूनही हीन असलेली अवकळा ही पूर्वजन्मींचीच पापे आहेत. एवढेच नव्हे तर शुद्रांपोटी जन्म घेणेही पुर्वजन्मीचे पापच आहे हे मनू महाराजांनी सांगितले आहे. ते फेडणे ता या जन्माचे आद्य कर्तव्य आहे. यावर चिडून माईंनी समाजातील विषमतेच्या अमानवी चालीरीती एका धूर्ताची नीती आहे असे म्हटले आहे.
अंधश्रद्धेवर सडेतोड प्रहार करतांना सावित्रीमाईंनी समाज कशा पद्धतीने या दलदलीत फस्त जाते या बाबतीत भाष्य केले आहे. दगडाला तेलात शेंदूर फासल्याने दगडात देव वास करीत नाही. म्हसोबा खेसोबा हे देव भयंकर असून त्यावर भाव भक्ती असणे धोक्याचे आहे. लेकरासाठी नवस करुन बकऱ्याची कंदोरी करण्यात येते. बाळ जन्माला आल्यानंतर नवस फेडण्यासाठी अत्यंत भावभक्तीने हे काम केले जाते. या दगडाला, धोंड्या दगडाला नवस केल्याने मुलं होत असतील तर नर नारी कशाला लग्न करतात? असा खडा सवाल त्यांनी विचारला आहे. यावर एकमेव पर्याय म्हणजे सावित्री वदते/करुनी विचार जीवन साकार करुनी घ्या असा सल्ला त्या देतात. चुकीचे मार्गदर्शन करुन आपला स्वार्थ साधणारे लोक या देशात मोठ्या प्रमाणावर आहेत. श्रद्धाळू लोकांचा फायदा घेऊन गोरगरीब जनतेला फसवून लुटणारे कैक आहेत. जे जसे बोलतात तसे कार्य करतात तेच पूजनीय ठरतात. सेवा परमार्थ मानून हे व्रत आपल्या जीवनात पाळतात, सार्थकी लावतात तेच वंदनीय आहेत. स्वतःचा स्वार्थ त्यागून इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणारे परहीत पाहतात तेच थोर असतात. या संबंधीने मानवाचे नाते/ओळखती जे ते, सावित्री वदते/ तेच संत असे म्हटले आहे.
पशु, शुद्र और नारी- सब है ताडन के अधिकारी या मनुप्रणित कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती त्या काळात या स्री आणि शुद्रातिशुद्रांना भारतीय समाज व्यवस्थेने सर्व प्रकारच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते. शुद्र खरे तर या देशातील नेटीव्ह असून त्यांनाच वर्णव्यवस्थेत तळाला होते. म्हणून माई म्हणतात, खरे शुद्र धनी/होते इंडियाचे, नाव असे त्यांचे/इंडियन, होते पराक्रमी/आमचे पूर्वज, त्यांचेच वंशज/आपण रे. खरे भारतीय इथले शुद्रातिशुद्रच आहेत. ज्यांनी वर्णव्यवस्थेत सर्वोच्च स्थान बळकावले ते विदेशी आहेत. आमचे पूर्वज अत्यंत पराक्रमी होते आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत या त्यांच्या ओळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करून देतात. महाड येथे १९२७ साली बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते की, तुम्ही शुर विरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे. तुम्ही भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथे कोरली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बेकरीची संतान नसून सिहांचे छावे आहात.
शिक्षणाने मानवाची सर्वांगीण प्रगती होते. ज्यांच्या अंगी विद्या नसेल तो पशु असतो. त्यांचे जीवन वाया जाते. मानवाने धनसंचय करु नये तर ज्ञानसंचय करावा. विद्या म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे. स्वस्थ बसू नये. शुद्र अतिशुद्र बांधवांना जागे व्हा, जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी तोडण्यासाठी उठा, शिकण्यासाठी तत्पर व्हावे असे आवाहन त्या एके ठिकाणी पद्यात करतात. इंग्रजीचे शिक्षणही घेतले पाहिजे असा माईंचा आग्रह इंग्रजी शिका या अभंगातून दिसून येतो. या अभंगाची मांडणी करताना इंग्रजी शिकल्यामुळे जातीभेद मोडता येतो अशी रचना करतात. शुद्र अतिशुद्र/दुःख निवाराया, इंग्रजी शिकाया/ संधि आली, इंग्रजी शिकूनि/जातीभेद मोडा, भटजी भारुडा/फेकुनिया. शुद्रातिशुद्रांना अज्ञानाने पछाडले आहे. देव, धर्म, रुढी, परंपरा आणि पूजा अर्चा यांच्या जोखडात पूर्णपणे अडकलेल्या शुद्रातिशुद्रांना दारिद्याने नेस्तनाबूत केले आहे. शुद्रत्व हे मानवी जीवनाचे कलंकत्व आहे. ते मिटविणे आवश्यक आहे. यासाठी मुलाबाळांना शिकवावे तसेच आपणही शिकावे.
सरस्वतीचा दरबार आता खुला झाला आहे तो पाहुया, चला शाळा शिकूया, ज्ञान मिळवून या ही गटातील संवादाची क्रीडाकाव्यता खूप मजेशीर आहे. ती गुलामगिरीची बेडी तोडून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. हे इतके अनर्थ करणाऱ्या अविद्येविरुद्धचे आंदोलन सोपे नव्हते. विद्या घेऊन ज्ञानात वाढ करावी त्याबरोबरच नीतीधर्मही शिकून घ्यावा असे त्या म्हणतात. शिक्षण घेण्याची इर्षा नसानसांत खेळवली गेली पाहिजे. आपल्यावर असलेला शुद्रत्वाचा कलंक आपण पुसून काढला पाहिजे. परंपरेच्या बेड्या कायमच्या तोडून टाकण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे ही कळकळ त्यांच्या काव्यातून अधोरेखित होते.
लेखक – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३.