श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान तर्फे उनकेश्वर तालुका किनवट येथील वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना चादर,सतरंजी व किराणा साहित्याचे वाटप शनिवार दि, २५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

श्री रेणुका देवी संस्थान तर्फे वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात यापूर्वी आरोग्य शिबिर,शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, डिजिटल शाळा खोली, अंगणवाडीना रंगरंगोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत तसेच कोरोना काळात पीएम केअर फंडांना ११ लाख रुपये मदत देण्यात आली आहे.

श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस.कोसमकर, संस्थांनच्या सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी किनवट तालुक्यातील उनकेश्वर या तीर्थक्षेत्रावर असलेल्या वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना चादर सतरंजी व किराणा साहित्याचे वाटप संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त संजय कान्नव,विश्वस्त दुर्गादास भोपी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, कर्मचारी अंकुश शिंदे अमोल राऊत तसेच उनकेश्वर देवस्थानचे कर्मचारी रमेश दूलरवार उपस्थित होते.
