हिमायतनगर, अनिल मादसवार| शनिवारच्या दिवशी दुपारी महावितरण कंपनीच्या वीज तारमध्ये घर्षण होऊन फुलंग्या पडल्याने उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील शेतकरी पांडुरंग नारायण रावते यांच्या सर्व्हे नं. 130 मधील सुमारे 1.5 एकर उसाचे पीक आहे. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी दुपारी विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे पेट घेत जळून खाक झाले. एकीकडे आग विझविली तरी दुरीकडे पेटं घेत होती, त्यामुळे हाता तोंडाला आलेला ऊस पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.


यंदा अतिवृष्टीने कहर केला त्यातून बचावलेल्या उसाला आता महावितरणाच्या वीज तारांचे घर्षण होऊन आग लागली. यामुळे शेतकऱ्यावर दुहेरी सनकोट कोसळले असून, या संदर्भात माहिती देताना शिवाजी सूर्यवंशी पारवेकर यांनी सांगितले की, घटनेची तात्काळ दखल घेऊन साखर कारखान्याने शेतकऱ्याचा उस न्यावा. आणि महावितरण कंपनीने शॉर्टसर्किटमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उचित भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



नुकसानीची पाहणी करून पंचनाम्यासह तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा महावितरणच्या विरोधात शेतकरी ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती शिवाजी सूर्यवंशी पारवेकर यांनी दिली आहे.



