नांदेड| विकसित कृषि संकल्प अभियानाच्या दहाव्या दिवशी बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड करण्यासाठी संकरीत बियाणे आणि योग्य बीजप्रक्रिया अत्यंत आवश्यक असून त्याद्वारे उत्पादनवाढ, मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते.


आजचे कार्यक्रम देगलूर तालुक्यातील शहापूर, चेनपुर, करेमालकपुर व मुखेड तालुक्यातील सेवादास नगर, भगनुर्वाडी, शिकरा या गावामध्ये आयोजित करण्यात आले होते. ड्रोनतंत्रज्ञान, अचूक सिंचन प्रणाली, संकरीत बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल चर्चा झाली.

विशेषतः बीजप्रक्रियेचे फायदे, सुधारित बियाण्यांची निवड आणि त्यांचा प्रभावी वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले बीजप्रक्रिया केल्याने बियाण्यांची उगम क्षमता वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि पीक अधिक निरोगी होते.

यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे, शास्त्रज्ञ श्री. डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ.थोरात व डॉ.बोरसे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.कपिल इंगळे, डॉ.प्रियंका खोले, वेंकट शिंदे तसेच प्रशांत शिवपणोर, बालाजी चांदापुरे व संतोष लोखंडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
