नांदेड| अर्धापूर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका १६ वर्षीय इयत्ता नववीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांला भरधाव येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिली. यात श्रीनिवास अडकिणे हा गंभीर जखमी झाला असून, उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील रस्ते चकाचक झाले असून, या रस्त्याने सुसाट धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने दिवसेदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक घटना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे घडली असून, यात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना अर्धापूर- तामसा रोडवर गुरुवारी सकाळी घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मयत मुलाचे नाव श्रीनिवास बालाजी अडकिणे वय १७, रा. हमरापूर, ता. अर्धापूर येथील रहिवाशी आहे.
तामसा ते अर्धापूर रस्त्यावर कचरू अडकिणे (चुलते) यांच्यासोबत श्रीनिवास अडकिणे जात असताना, श्रीनिवास रस्त्याकडेला थांबला होता. यावेळी भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यास धडक दिली. यात श्रीनिवास अडकिणे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जखमी श्रीनिवासला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे यांना कळल्यानंतर १०८ चे डॉ. आनंद शिंदे, चालक संभाजी कल्याणकर, नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत श्रीनिवास अडकणे हा जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर येथे इयत्ता नववीत शिकत होता. त्याच्या पश्चात पश्चात आई- वडील व एक छोटा भाऊ, असा परिवार आहे.