Blog

Nana Patole | शेतकऱ्यांसाठीच्या डीबीटी योजनेत मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, बाजारभावापेक्षा चौपट दराने खरेदी – नाना पटोले -NNL

मुंबई| शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेत सुधारणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नसताना त्यात बदल केले गेले. कृषी आयुक्तांनी त्याला विरोध केला असता त्या कृषी आयुक्ताचीच बदली करण्यात आली. या डीबीटी योजनेतून मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप करत सरकारने या घोटाळ्यावर १५ दिवसात उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधिमंडळात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कृषी डीबीटी योजनेत जे साहित्य खरेदी केले ते बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट ते चौपट दर देऊन खरेदी करण्यात आले. हे कंत्राटही गुजरातच्याच एका कंपनीला देण्यात आले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतानाही राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये झालेली वाढ गंभीर आहे. सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला पण वाढत्या आत्महत्या होत असताना, कृषी क्षेत्रात पिछेहाट होत असताना पुरस्कार कशाच्या आधारावर मिळाला. राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली, पाऊस कमी पडला आणि शेतकऱ्यांच्या बागा जागीच जळाल्या. सरकार शेतकऱ्यांना मदत केल्याचे मोठ मोठे आकडे सांगते तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलत नाही.

सध्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी लागणारे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला वेळवर मिळत नाही. तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. हे दाखले ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागतात. एकीकडे प्रवेशासाठी दाखल्यांची गर्दी तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरण्याची गर्दी यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. तहसील कार्यालयात कर्माचारी वर्गही पुरेसा नाही आणि या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या जागी ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था करात येईल का, हे पहावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे विधान राज्याच्या मंत्र्याने करून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला खऱ्या अर्थाने ठेच पोहचवली. नंतर त्यांनी सारवासारव केली पण असे वक्तव्य करावे ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाच-पाच वर्ष शिष्यवृत्ती मिळत नाही. सरकार जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करते पण विद्यार्थ्यांना मात्र शिष्यवृत्ती देत नाही असे नाना पटोले म्हणाले.

महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अटल सेतूला भेगा पडल्याचे दाखवले तर माझी टिंगल उडवली गेली आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या. समृद्धी महामार्गावर दररोज अपघात होतात आहेत त्याला जबाबदार कोण आहे. राज्यात हिट अँड रन चे प्रकार वाढले आहेत, ड्रग्जसेवनचे प्रमाणही वाढले आहे. जळगाव हिट अँड रन प्रकरणात तर तक्रार दाखल करणाऱ्यालाच पोलीसांनी मारहाण केली. महायुती सरकारने काय दिले ह्याचे राज्यातील जनतेला उत्तर द्या. तीन तोंडाच्या इंजिनाने राज्याची अधोगती केली, असेही नाना पटोले म्हणाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!