नांदेड| नांदेड येथे आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मध्ये परभणीच्या बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाने कुसुम नाट्यगृहात बुधवारी (ता.४) सादर केलेले ‘विक्रमाचा घातांक क्ष’ हे नाटक प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरले. लेखक रविशंकर झिंगरे यांनी नाटकाच्या माध्यमातून मानवी जीवनातील महत्वाकांक्षा आणि संस्कार यांच्यातील संघर्ष उत्तम पद्धतीने मांडला आहे, तर दिग्दर्शक अतुल साळवे यांनी या गहन आशयाला प्रभावी सादरीकरणातून न्याय दिला आहे.
नाटकाचा मुख्य गाभा आहे संस्कारांचे महत्त्व. विक्रम हे पात्र सर्वसामान्य माणसाचे प्रतीक आहे, तर वेताळ हे संस्कारांचे. विक्रमाला स्वतःच्या इच्छांची पूर्तता करताना संस्कार अडथळा वाटतो आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. नाटकात विक्रमाला वेगवेगळे गूढ भास होत राहतात, पण शेवटी संस्कारांचा विजय होतो. “संस्कार कधीच मरत नाहीत,” हा सकारात्मक संदेश नाटकाच्या शेवटी ठामपणे मांडला जातो.
दिग्दर्शक अतुल साळवे यांनी या नाटकाबाबत मनोगत व्यक्त करताना म्हटले, “प्रत्येकाच्या जीवनात महत्वाकांक्षा असतात, पण त्या पूर्ण करताना संस्कारांचा आदर करणे गरजेचे असते. हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल.”
या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीचे मोठे योगदान आहे. विक्रमाची भूमिका अतुल साळवे यांनी साकारली असून, वेताळाची भूमिका प्रकाश बारबिंड यांनी उत्तम प्रकारे उभी केली आहे. ऐश्वर्या कामतीकर, तुषार चौधरी, गोविंद मोरे आणि ज्ञानेश्वर रेंगे यांनी देखील आपापल्या भूमिकांमधून नाटकाला रंगत आणली आहे.
नाटकाचे निर्माते संजय पांडे असून, नेपथ्य अनिल साळवे व प्रसाद देशपांडे यांनी सांभाळले आहे. प्रकाश योजना प्रणव कोरे आणि सौ. सरोज पांडे यांची असून, संगीत व्यवस्था दिनेश नरवाडे आणि श्रध्दा वडजकर यांनी केली आहे. रंगभूषा सौ. रेवती पांडे व सौ. निर्मला जोशी यांनी सांभाळली आहे, तर वेषभूषेची जबाबदारी संकेत पांडे आणि प्रशांत बारबिंड यांच्यावर होती.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.