नांदेड| जिल्हाधिकारी यांनी शहरातुन अवजड वाहन वाहतुकीला बंदी घातली आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून या आदेशाची अमलबजावणी करण्यात चालढकल केली जात आहे. वर्दळीच्या वेळेत शहरातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना आनंदनगर रस्त्यावर गुरूवारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. यापूर्वीही शहरात अवजड वाहने आणि गौण खणिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. पुन्हा एकाचा जीव गेल्यांने अवजड वाहनावर केलेल्या बंदीच्या आदेशाचा काय..? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक, दुचाकीस्वारातून विचारला जात आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील आनंदनगर भागातून रस्त्याने स्कुटीचालक जातांना रस्त्यावरील एका कारचालकाने अचानक दरवाजा उघडला. त्या दरवाज्याला लागून स्कुटी चालक विजय रामतीर्थकर वय ४५ वर्ष रा.हर्षनगर हे सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर धाडदिशी पडले. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या रेती वाहतुकीच्या टिपर क्रमांक एम.एच.०४ पीएल ८८३५ ने त्या स्कुटी चालकाला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज पोलिसांकडून तपासण्यास सुरुवात केली असून, यात जर कार व टिप्परचालक दोघेही दोषी आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असे विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगीतले.


मागील अपघाताच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात अवजड वाहतुकीस बंदी घातली असंल्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी करणे पोलिसांचे काम आहे. परंतू या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. परिणामी वर्दळीच्या वेळेत शहरातून अवजड वाहने धावत आहेत. खास करून रेती, मुरूप, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सर्रास धावत आहेत. यात रेती वाहतूक करणाऱ्या हायवा, टिप्परची संख्या सर्वाधिकी असून याच वाहनांमुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांचे अनेक बळी गेले आहेत. शहरात आनंदनगर रस्त्यावर गुरुवारी सकाळी रेती वाहतूक करणा-या टिप्परने आणखी एकाचा बळी घेतला.


हर्षनगर येथील रहिवाशी विजय कांतराव रामतीर्थकर वय ४५ हे सकाळी १२ च्या सुमारास दुचाकीवरून आनंदनगर रस्त्याहून जात होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच ०४ पीएल ८८३५ या रेतीच्या टिप्परने धपडक दिली. यात टिप्परच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंदी असतांना जड वाहने कशी काय..? धावतात. याचा शोध घेऊन पोलिस अधिक्षकांनी रेती माफियांच्या संपर्कात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

तत्कालिन अति. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्णयाची आठवण
नांदेडचे तत्कालिन अति. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड शहरामध्ये सकाळी ८ ते रात्री १० दरम्यान जह वाहनांना प्रवेशबंदी केली होती. त्याचप्रमाणे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वर्कशॉप ते हबीब टॉकीज या प्रमुख मार्गावरून मोर्चे, आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु उमाप यांनी सांगितले की, आपण आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक आणि हिंगोली गेट ब्रिजमार्गे आपला मोर्चा काढावा, असे सूचित केल्यानंतर चव्हाणांनी देखील तात्काळ मान्य केले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीव राहिली. तोच नियम जर आजपर्यंत कायम राहिला असता तर आजची आणि यापूर्वी झालेल्या घटना टाळल्या असत्या असेही जाणकार बोलू दाखवीत आहेत.


