नांदेड l स्वाधार योजनेचा हक्काचा लाभ मिळावा म्हणून दलित संवर्गातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात धडपड करीत आहेत. पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वेळ पुरत नसल्याने आणि त्यातल्या त्यात आठवडी सुट्या आल्याने स्वाधार अर्जदारांची धावपळ होताना दिसत आहे. स्वाधारचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून ती देखील डीवायएफआय सारख्या संघटणांनी सरकारच्या विरोधात आंदोलने करून वाढवून घेण्यात यश मिळविले आहे.
घटना दि.२७ डिसेंबरची आहे.नांदेड तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील दलित संवर्गातील फालाजी गभू सरोदे यांनी राहिवासी व जातीच्या प्रमाणपत्र मिळावे म्हणून दि.११ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे साईट बंद असल्यामुळे व सर्व्हर चालत नसल्याने अर्जदाराला प्रमाणपत्रे मिळाली नव्हती. शनिवार व रविवारच्या सलग सुट्या असल्याने अर्जदाराची धाकधूक वाढली होती.
अर्जदाराचे नातेवाईक कॉ.श्याम सरोदे व कॉ.जयराज गायकवाड हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून कसोशिने प्रयत्न करीत होते. कार्यालयीन वेळ निघून जात होती.सायंकाळचे साडेसहा वाजून गेले व प्रयत्न करणारे कार्यकर्ते हाताश होऊन गावाकडे निघण्याच्या तयारीला लागले होते. तेवढ्यात त्यांना पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सुरु असलेल्या मनपा समोरील उपोषणाच्या टेंट मध्ये सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड दिसले. कॉ.जयराज व कॉ.श्याम यांनी सर्व हकीगत कॉ.गंगाधर गायकवाड यांना सांगितली.
त्यांनी लगेच नांदेडचे एस.डी.एम. डॉ.सचिन खल्लाळ आणि निवासी उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी महेश वडदकर यांना व्हाट्सअपवर संदेश पाठवून विनंती केली आणि अर्जदार लाभापासून वंचित राहू नये यासाठी मदत करावी असे कळविले. दोन्हीही कर्तव्यदक्ष उप जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन कॉ.गायकवाड यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला आणि अत्यंत जलद गतीने केवळ पंधरा मिनिटात जातीचे व राहिवासी प्रमाणपत्र दिले.
कॉ.गंगाधर गायकवाड यांना दोन्ही उप जिल्हाधिकारी महोदयानी व्हाट्सअपवर दिलेला रिप्लाय आणि तात्काळ दिलेले प्रमाणपत्र हे एका दलित अर्जदाराला दिलासा देणारा व प्रशासनाप्रति आदरभाव निर्माण करणारा प्रकार आहे. महेश वडदकर रिप्लाय मध्ये म्हणत आहेत “आपण सांगितल्या नंतर १५ व्या मिनिटाला सदर प्रमाणपत्र देण्यात येत आहे.गतिमान प्रशासन.” तर डॉ.सचिन खल्लाळ म्हणतात ” जात प्रमाणपत्र झाले मित्रा ” आणि सहकार्य केल्याची खूण दर्शवीत आहेत. दोन्हीही उच्च पदस्त अधिकारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आजी आणि माजी निवासी उप जिल्हाधिकारी राहिले असून सद्यस्थितीत महेश वडदकर हे आरडीसी म्हणून योग्यरित्या कार्य करीत आहेत.
तरुण तडफदार असलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रति दक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.
या गतिमान कार्य प्रणाली मुळे डॉ. सचिन खल्लाळ आणि महेश वडदकर यांच्या प्रति समाजात आदरभाव निर्माण झाला आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुढील कार्यवाही साठी सकारात्मक दृष्टीने कर्तव्य पार पाडल्यास निश्चितच गरीब दलित संवर्गातील पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे.
डीवायएफआय संघटनेच्या वतीने कर्तव्यदक्ष आजी माजी आरडीसी महोदयांचे आभार मानले असून त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. अशी माहिती डीवायएफ संघटनेचे तालुका व शहर निमंत्रक कॉ.श्याम सरोदे व कॉ.जयराज गायकवाड यांनी दिली आहे.