हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील नगरपंचायत कडून देण्यात आलेला महसुलचा खोटा अहवाल सत्य समजुन हिमायतनगर येथील रजीस्ट्री कार्यालयामार्फत स्वार्थापोटी अनधिकृतपणे दस्तनोंदणी केल्या जात आहेत. वरीष्ठांच्या पाठबळावर येथील दुय्यम निबंधक अधिकारी काम करीत असल्याचे समोर येत असून, दुय्यम निबंधक कार्यालयात असलेल्या बॉण्ड विक्रेत्याच्या संगनमताने एक खाजगी व्यक्ती आपल्या एका रजिस्ट्रीला पावती पेक्षाही ५ ते १० हजार रुपये जास्त उकळत असल्याचे सांगितले जात आहे. हि बाब लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालयात मागील काळात झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी केल्यास अनधिकृत पद्धतीने झालेल्या रजीस्ट्रीच्या कारभाराचे पितळे उघडे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकारच्या चौकशीसाठी हिमायतनगर येथील नारायण माने यांनी जिल्हाधिकारी नांदेड व संबंधितांकडे तक्रार देऊन मागणी केली आहे.
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी मागील काही वर्षांपासून अनधिकृतरित्या लेआऊट पाडण्यात आलेले आहेत. तसेच बहुतांश लेआऊटमध्ये तत्कालीन तहसीलदार डी.एन.गायकवाड यांची मागल्या तारखेत स्वाक्षरी घेऊन बोगस अकृषक आदेश पारित करून जमिनीचे लेआऊट करत छोटे छोटे भाग करून बोगस पद्दाथीने दस्त नोंदणी केली जात आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या रजीस्ट्रीची रक्कम रजिस्ट्रार काढीत असुन, एका एका रजीस्ट्रीला पावती पेक्षाही ५ ते १० हजार रुपये जास्तीचे द्यावे लागत असल्याचे या प्रकारास बळी पडलेल्या मालमत्ता धारकाकडून सांगितले जात आहे. तर कोणतेही आदेशाची प्रमाणित प्रत नसताना आर्थिक देवाण घेवाण करून रजिस्ट्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार होत आहेत. तर खऱ्या व नियमानुसार कागदपत्रे देऊनही दस्तनोंदणीसाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य गरजूंची लूट चालविले जात असल्याची ओरड होऊ लागली आहे.
त्यामुळे रजीस्ट्री कार्यालयाच्या मनमानी कारभाराला मालमत्ता घेणार, देणार वैतागुन गेले आहेत. लोप्रतिनिधि असो की, वरीष्ठ अधिकारी आमचे कोणीच कांही करु शकत नाहित या तोऱ्यात येथील दुय्यम निबंधक आणि बाँड विक्रेते वागत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाकडुन हिमायतनगर शहरातील जागेची रजीस्ट्री करताना नमुना ४३ दिला आणि नगरपंचायतचे मालमत्ता नोंद प्रमाणपत्र दिल की, सरळ सरळ रजीस्ट्री होत आहे. रजीस्ट्री करताना मुमीअभिलेख कार्यालयाचे नाहरकत प्रमाण पत्र किंवा पीआर कार्ड, ७/१२, एन. ए.आदेशाच्या प्रमाणित प्रति जोडणे आवश्यक असतांना देखील याकडे दुर्लक्ष करुन नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर नकाशा आदेश झालेला नसताना हिमायतनगर येथील दुय्यम निबंधक कोणतेही कागदपत्रे न तपासात आर्थिक देवाण घेवाण करून मूळ जमिनीचे शासकीय मूल्यांकन कमी दाखवून शासनाची दिशाभूल करत मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी (रजीस्ट्री) करत असल्याचे व्रत्त आहे.
हिमायतनगर येथील रजीस्ट्री कार्यालयात असलेल्या बाँड विक्रेत्यांपैकी एका विक्रेत्याने खाजगी व्यक्ती ठेवुन दुय्यम निबंधकांना माया देउन आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्याचा धडाका चालू ठेवला आहे. मागील काही वर्षांपासून येथील कार्यालयाचा कारभार प्रभारी दुय्यम निबंधकावर चालत होता. कायम दुय्यम निबंधक आल्यानंतर या आलबेल कारभारावर अंकुश बसून देणार घेणाऱ्याची लूट थांबेल अशी अपेक्षा सर्वाना होती. मात्र हिमायतनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या शेतकरी व गरजू नागरिकांची दुय्यम निबंधकांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात पिळवणुक होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात होत असलेल्या आलबेल प्रकाराची तक्रार देऊनही संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. मागील काळात झालेल्या दस्तनोंदणी (रजिस्ट्रीची) तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणात अनधिकृत दस्तनोंदणीचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.
हिमायतनगर येथील नारायण माने या व्यक्तीने दिनांक १८ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथील दुय्यम निबंधकाकडून केल्या जाणाऱ्या अनधिकृत दस्त नोंदणीची तक्रार देऊन चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापही याबाबतची कोणतीही चौकशी झाली नसल्याने हिमायतनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला कुणाचे..? पाठबळ आहे असा प्रश्न तक्रारदारांने उपस्थित केला आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अनधिकृत कारभाराच्या चौकशीच्या मागणी तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत हिमायतनगर व सर्व पत्रकार मंडळींना पाठवीले आहे.