नांदेड| प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) नांदेड जिल्ह्यात प्रपत्र ड मधील प्रतीक्षा यादीतील एक लाख 20 हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. यावर्षी राज्य शासनाने नांदेड जिल्हा परिषदेला या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 10 हजार 30 घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी दिली.

ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात हे उद्दिष्ट निश्चित होईल. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्ड, बँक खाते, जॉब कार्ड, नमुना नंबर 8 व ग्रामपंचायतीची मान्यता यासह इतर आवश्यक माहितीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय घरकुल लाभार्थ्यांची संख्या या प्रमाणे- अर्धापूर तालुक्यात 1 हजार 936, बिलोली 7 हजार 444, किनवट 9 हजार 785, हादगाव 11 हजार 67, भोकर 5 हजार 58, हिमायतनगर 4 हजार 890, देगलूर 9 हजार 105, मुदखेड 2 हजार 944, मुखेड 16 हजार 531, धर्माबाद 3 हजार 152, नांदेड 5 हजार 228, कंधार 10 हजार 641, नायगाव 10 हजार 715, उमरी 6 हजार 107, लोहा 9 हजार 769 तर माहूर तालुक्यात 5 हजार 597 पात्र घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

घरकुलाच्या लाभासाठी कोणत्याही आर्थिक व्यवहाराची गरज नाही. प्रतीक्षा यादीत असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल. ज्यांचे नाव या यादीत नाही पण ते पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांनी केले आहे.
