नांदेड| शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेटी (Visit activities in schools) या विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी येत्या 16 जून रोजी, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या मतदारसंघातील किंवा जवळच्या शाळेला भेट देतील. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत सुविधा व कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल.


जिल्ह्यातील सर्व 2 हजार 185 जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून यंदा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग या उपक्रमाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासन, पालक व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संबंधित लोकप्रतिनिधी शाळांना भेट देतील. नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे विष्ण्ुपूरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे भेट देणार आहेत.

खासदार रवींद्र चव्हाण हे जिल्हा परिष्द हायस्कुल घुंगराळा, खासदार अशोक चव्हाण जिल्हा परिषद हायस्कुल नुतन भोकर, खासदार डॉ. अजित गोपछडे जिल्हा परिषद हायस्कुल लोहगाव, आमदार प्रतापराव चिखलीकर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सोनखेड, आमदार डॉ. तुषार राठोड जिल्हा परिषद हायस्कुल कन्या शाळा मुखेड, आमदार रोजश पवार जिल्हा परिषद हायस्कुल कुंटूर, आमदार श्रीजया चव्हाण जिल्हा परिषद हायस्कुल मुगट, आमदार बालाजी कल्याणकर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा, आमदार हेमंत पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पासदगाव, आमदार आनंदराव तिडके बोंढारकर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, जवाहरनगर तुप्पा, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर जिल्हा परिषद कंद्रीय प्राथमिक शाळा, निवघा, आमदार भिमराव केराम जिल्हा परिषद हायस्कुल बोधडी (बु) येथे भेट देणार आहेत.

तर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले- जिल्हा परिषद हायस्कुल वाघी, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली- जिल्हा परिषद हायस्कुल तामसा, जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव, नांदेड-वाघाळा माहानगरपालिकेचे आयुक्त- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी येथे भेट देणार आहेत. तसेच जिल्हयातील सर्व वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारीही विविध शाळांना भेटी देणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व मुख्याध्यापकांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तयारी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विशेष उपक्रम- इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना पुस्तक व पेन्सिलचे वाटप करण्यात येईल. स्मरणशक्तीवर आधारित बुद्धीचे खेळ आयोजित केले जातील. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन मोजणे आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्याचा उजव्या हाताचा ठसा चार्ट पेपरवर घेऊन तो वर्गात लावण्यात येईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून “स्मरणघडी पत्रिका” भरून घेतली जाईल. ही पत्रिका 2035 साली उघडून त्या दिवसाचे स्मरण करण्याचा संदेश दिला जाईल. तसेच इयत्ता पहिलीतील प्रवेशित विद्यार्थी, मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक यांचा सामूहिक फोटो काढण्यात येईल. या फोटोची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला वितरित केली जाईल.
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली प्रवेशासाठी विशेष उद्दिष्ट
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी यावर्षी एकूण 32 हजार 59 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने यंदा दहा टक्के जास्तीचे उद्दिष्ट ठेवून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार एकूण सुमारे 35 हजार 265 विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.