नांदेड, अनिल मादसवार| भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचा मुद्दा (Provide crop loans to farmers – MLA Sreejaya Chavan) आज विधानसभेत मांडला. शेतकरी आर्थिक अडचणीत असून, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.


विधानसभेत बोलताना आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. कालपर्यंत नांदेड जिल्ह्यात ८२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरित झालेले नाही. नांदेड जिल्ह्यात खरिप हंगामासाठी एकूण १ हजार ८५० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु, आतापर्यंत केवळ ९०० कोटी रुपये म्हणजे सुमारे ५० टक्के कर्ज वितरण झाले आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ४४५ कोटी रूपयांचे वाटप करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सुमारे २५० कोटी म्हणजे ५७ टक्के तर, खासगी बँकांनी सुमारे २०० कोटी रुपये म्हणजे केवळ २१ टक्केच इतकेच कर्ज वाटप केले आहे.

दि. ९ व १० जून रोजी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे, प्रामुख्याने केळी, पपई सारख्या फळपिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले केळीचे पीक गमावावे लागले. बाजारात केळीचे भाव कमी झाले, असे सांगून आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना बँकेतून पुरेशा प्रमाणात कर्ज मिळाले नाही तर त्यांना नाईलाजाने खासगी सावकाराकडे जावे लागते, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
