कंधार, सचिन मोरे l कंधार तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे मतदार संघातील अनेक छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन बऱ्याच गावचा संपर्क तुटला होता. कंधार तालुक्यातील छोट्या-मोठ्या सर्व पुलांची माहिती घेऊन तात्काळ अंदाजपत्रक तयार करा असा आदेश लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील आढावा बैठकीत दिला.


याबाबत सविस्तर माहिती अशी की कंधार तहसील कार्यालयात पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा बैठकीचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, भाजपा नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर, राष्ट्रवादीचे मनोहर पाटील भोसीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, स्वप्निल पाटील लुंगारे,माजी जि प सदस्य बाबुराव गिरे, किशनराव डफडे, सा.बां.चे उपअभियंता सुमित पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव,जि प चे उपअभियंता बसवदे, लघु पाटबंधारेचे बनसोडे, ग्रामसेवक संघटनेचे गंगाधर कांबळे, मधुकर पाटील डांगे, बाळासाहेब पवार यांची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले की कंधार तालुक्यातील बरेचसे लहान-मोठे पूल हे जुने झाले असून त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी देखील गेले होते. त्या सर्व पुलांची सविस्तर माहिती तयार करून त्यांचे तात्काळ सुधारित पद्धतीने अंदाजपत्रक तयार करा. सर्व पुले अद्यावत व मजबूत पद्धतीने बनविण्यासाठी सरकारकडून लागेल तेवढा निधी खेचून आणण्याची ग्वाही आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिली.


बैठकीच्या सुरुवातीस नैसर्गिक आपत्तीत मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून ठार झालेल्या ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम व त्यांचे पती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शेख नासेर या दाम्पत्याच्या दोन मुलांना आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रत्येकी चार लाख रुपयाच्या शासकीय मदतीचे ई – अडव्हाइस प्रदान करण्यात आले.

आमदारांनी बैठकीत अतिवृष्टीमुळे प्रभवित झालेल्या रस्त्या बरोबरच मन्याड नदी, धरण, तलावांची स्थिती जाणून घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले. यावेळी बोलताना चिखलीकरांनी दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला. सर्वांनी मिळून नैसर्गिक आपत्तीला सामोरे गेले पाहिजे. कर्तव्यात कसूर झालेली यापुढे सहन केली जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या आढावा बैठकीला तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनार प्रकल्प अधिकारी, विष्णुपुरी प्रकल्प विभाग, लघुसिंचन जलसंधारण विभाग, विद्युत पारेषण विभागचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प कार्यालय, एसटी महामंडळ आदी खात्याचे प्रमुख, त्यांचे प्रतिनिधी, तालुक्यातील सरपंच आदी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

