हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परीसरात दिनांक ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या कथा सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.


भव्य शिवमहापुराण कथा मंचावरून श्रीश्रीश्री १००८ अनंत श्रीविभुषित स्वामी राजेंद्रदास महाराज यांच्या मधुर वाणीतून दुपारी १२ ते ४ या वेळात शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे. तसेच १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ सकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. या कथा कुंभ सोहळ्याला अयोध्या, वृंदावन, ऋषिकेश, जगन्नाथपुरी, बद्रिनाथचे मुख्य पुजारी, ऊज्जैन जगद्गुरू संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील साधुसंत, महंतांच्या विशेष ऊपस्थीती लाभणार आहे. या धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, भाविकांनी कथा व यज्ञाला येताना स्नानं करून यावं असं आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलं आहे.

या सत्संग सोहळ्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर- प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज, यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते देखील येणार आहेत. कथेसाठी येणाऱ्या महंतासाठी २७ वातानुकूलित भक्त निवास, ५० राजस्थानी खुंट्या, हदगाव, तामसा, भोकर येथे वातानुकूलित सेवा असणारी सुविधा करण्यात आली आहे. १८ एकर जमिनीवर ३०० बाय ५०० आकाराचा कथेचा सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महाप्रसादसाठी महिला आणि पुरुषांना वेग वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान रविवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, यांनी भेट देऊन बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि महाशिवपुराण कथा सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी कांबळे, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सुधाकर भोयर, गजानन तूपतेवार, यांच्यासह पोलीस अधिकारी व महिला पुरुष नागरिक, स्वयंसेवक भाविक भक्त व हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
