हिमायतनगर (अनिल मादसवार) “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं… उठ बंजारा जागा हो, आरक्षणाचा धागा हो…” अशा जोशपूर्ण घोषणांनी हिमायतनगर तालुका शुक्रवारी दुमदुमून गेला. सकल बंजारा समाजाच्या वतीने एस. टी. आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेला विराट महाएल्गार मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला.



हैद्राबाद गॅझेटनुसार नोंदी असलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली. मागील काळात मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून आरक्षण मिळाले, त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही न्याय मिळावा, असा आवाज मोर्चातून उठला.



मोर्चाची सुरुवात श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदान येथील सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर डॉ.अनिल खोला, मुखेडचे आमदार तुषार राठोड, बी.डी. चव्हाण, दिलीप राठोड, डॉ. दामोधर राठोड, आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुषांनी एकत्रितपणे तहसील कार्यालयावर कूच केली.




महिला मंडळाच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. या मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा बांधव, महिला व युवा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कैलास राठोड, आशिष सकवान, राजेश जाधव, कुणाल राठोड, सुनील चव्हाण, लखन जाधव, प्रमोद राठोड, दिनेश राठोड, लक्ष्मण जाधव, बालाजी राठोड, विशाल आडे, आदींसह समस्त सकल बंजारा समाज बांधवानी परिश्रम घेतले.




