नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड ही संस्था जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्याचे सर्वोच्च केंद्र आहे. त्यामुळे याठिकाणच्या वैद्यकीय सुविधासाठी शासन प्रयत्नशिल असून, लवकरच नवीन सिटी स्कॅन मशिन येणार असून जुन्या मशिनची दुरुस्ती प्रस्तावित असल्याची माहिती जिल्ह्याचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता एस.बी. देशमुख यांनी दिली आहे.
काही वृत्तपत्रात सिटी स्कॅन मशिन संदर्भात आलेल्या वृत्ताबाबत खुलासा देताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. ही संस्था गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय उपचारासाठी आशास्थान असून यासंदर्भात दिशाभूल करणारे वृत्त प्रकाशित करण्यात येवू नये तसेच वस्तुस्थिती देखील स्पष्ट करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी सिटी स्कॅन संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांना कळविली आहे.
सिटी स्कॅन मशीन दुरुस्ती
महाविद्यालयाने सिटी स्कॅन मशीनच्या दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मशीन दुरुस्तीसाठी शिल्लक राहीलेली रक्कम रु. 65 लक्ष अदा केल्याशिवाय दुरुस्ती करणे शक्य नसल्याने कळविले आहे. ही रक्कम अदा करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त मुंबई यांच्याकडून परवानगी अंतिम टप्प्यात असून परवानगी मिळताच ही रक्कम संबंधित पुरवठादारास तातडीने अदा करुन लवकरच सी.टी स्कॅन मशनि रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात येईल.
नवीन सिटी स्कॅन मशीन प्रस्ताव – रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यात आले आहे. संबंधित पुरवठादाराकडून मशीन लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असेही कळविले आहे. याशिवाय मोबाईल सिटी स्कॅन मशीन देखील या रुग्णालयासाठी मंजूर झाली असून संबंधित पुरवठादाराकडून लवकरच हे मशीन कार्यान्वित करुन रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
कर्मचारी वेतन आणि कार्यप्रणाली – सिटी स्कॅन विभागातील कर्मचारी नियमित पदावर कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना सिटी स्कॅन सेवेसाठी जिल्हा सामान्य, रुग्णालय, नांदेड कार्यालयात पाठविले जात आहे. सर्व सिटी स्कॅन तंत्रज्ञ त्याठिकाणी रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत.
भंगार विषयक – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड तर्फे भंगार विषयी चौकशी गठीत करण्यात आली आहे. सदर प्रकरणी चौकशी अंतिम टप्यात आहे. रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या सेवेसाठी वचनबध्द असून सर्व समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे असेही त्यांनी कळविले आहे.