नांदेड| दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन लातूरच्या समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

शहरातील सामाजिक न्याय भवन येथे नुकतेच श्रवण शिक्षण महत्व या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रादेशिक उपायुक्त देवसटवार बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार, दिनकर जोशी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. क्षितीज निर्मल, तुकाराम धुमाळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना देवसटवार म्हणाले की, सामान्यांप्रमाणेच दिव्यांग व्यक्तीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शालेय शिक्षण घेताना दिव्यांगांना विशेष उपचार विशेष शिक्षक व वाचा उपचार तज्ञ यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दिव्यांग शाळेच्या कर्मचाऱ्यांनी वेतनापेक्षा आपण समाजाचे देणे आहोत, या भूमिकेतून कार्य करणे गरजेचे आहे. केवळ हक्कच नाही तर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत दिव्यांगाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा. दिव्यांग विद्यार्थी समाजच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहनही देवसटवार यांनी केले आहे.


याप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. क्षितीज निर्मल आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तुकाराम धुमाळ, सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले तर उपस्थितांचे आभार कैलास मोरे यांनी मानले, या कार्यशाळेस जिल्ह्यातील कर्णबधीर शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक व वाचा उपचार तज्ञ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शशिकांत पांपटवार, सुयोग कांबळे, बलभीम केंद्रे आदींनी परिश्रम घेतले.


