काही दिवसांपूर्वी हे नाव नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव सर यांच्या समवेत काही तरुण येऊन एक मोहीम चालवायचे त्यानिमित्ताने कानावर आले. त्याविषयी अधिक माहिती घेतल्यावर समजले की,जुन्या नांदेडमध्ये एक पडगळीस आलेला किल्ला आहे त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी हे तरुण “नंदगिरीचे किल्लेदार”या नावाने एकत्र येऊन काम करतात. अजून खोलात जाण्याचा विचार केला कुठे आहे हा किल्ला?याचा काय इतिहास आहे? त्यावेळी समजले की, नंदागिरी उर्फ नंदिग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून आपल्या शहराला प्रथम नंदीग्राम हे नाव प्राप्त झाले. कालांतराने ते नांदेड म्हणून ओळखल्या जाऊ लागले.ज्या किल्ल्यामुळे आपल्या शहराला नाव प्राप्त झाले.आम्ही नांदेडकर त्यालाच विसरलो !
त्याचं वैभव,त्याचा ऐतिहासिक वारसा जपण,संवर्धन करणार या धावपळीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी मागेच पडून गेल.ऐतिहासिक असलेला हा किल्ला झाडाझुडपांनी दडून गेला.गुन्हेगारांचा आसरा झाला हे आपल्याला कळच नाही.

1फेब्रुवारीपासून “नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार आणि नंदगिरी किल्ला संवर्धन समिती”यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य असे कार्यक्रम नंदगिरी किल्ल्यावर राबवल्या जात आहेत.सामाजिक चळवतील सहकारी बांधव बाजीप्रताप पाटील व विशाल इंगळे दोघेही आग्रह करत होते “ताई, जिजा समवेत एकदा नंदगिरीवर या!आपले शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे”. याआधी ही अनेक वेळा जाण्याचे ठरवले परंतु कधी जमले नाही पण काल सहकुटुंब जाण्याचा निर्णय सकाळीच घेतला. सायंकाळी पावले नंदगिरीच्या किल्ल्याकडे वळवली शहरात इतका देखना, स्वच्छ, विद्युत रोषणाईने सजलेला नंदगिरी किल्ला डोळ्यास पडला.पाहता क्षणी मन प्रसन्न झाले पण, मनाला खंत ही वाटली “नंदगिरी” या डोळ्यांनी पाहण्यासाठी बराच वेळ लागला. “महाबली शहाजीराजे ऐतिहासिक शस्त्र संवर्धन व जतन ट्रस्टच्या वतीने ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते.एक जणांनी जाऊन सांगितले ताई आणि पाटील आलेत आमचा बाजी स्वागतास तत्पर!

राष्ट्रकूट वंशातील, इ.स 1200 पूर्वी ,हम्पी काळातील शिवकालीन तलवारी,खंजीर,भाले,कुऱ्हाडी,किल्ल्याची कुलूप,ढाली अनेक शिवराई होन, ऐतिहासिक दस्तावेज अशा जवळपास साडेतीनशेहून अधिक ऐतिहासिक शस्त्र व ऐतिहासिक वस्तूंचे,दस्तऐवजांचे शोध घेऊन आपल्या परिश्रमातून ते मिळून या दोन भावंडांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर छंद म्हणून जोपासणाऱ्या होन संकलनाची आवड आणि त्याचे रूपांतर कधी महाबली शहाजीराजे भोसले ऐतिहासिक शस्त्र संवर्धन व जतन ट्रस्टमध्ये केले हा त्यांचा प्रवास पाहून थक्क झाले. नव्या पिढीसाठी,नव्या पिढीतील तरुणांनी उभा केलेला हा नवा आदर्श अत्यंत प्रेरणादायी आणि मन भरून देणार होता. प्रत्येकाने सहकुटुंब पाहावे.नव्या पिढीला फक्त पुस्तकातच न वाचता प्रत्यक्ष आपल्या राजांनी युद्धकाळात वापरलेले शस्त्र दाखवण्यासाठी एकदा हे शस्त्र प्रदर्शन जरूर पाहावे.

गडाचा परिसर,तोफ,नांदेड जिल्ह्यातील चित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले नांदेड येथील अनेक वास्तुचे अतिशय सुंदर असे चित्र प्रदर्शन देखील या ठिकाणी भरले होते.”नंदगिरीच्या बुरुजावरून देशभक्तीपर गीत”चा सुरेख अशा कार्यक्रमास उपस्थित लावली.अतिशय सुरेल व बाहारदार असे देशभक्तीपर गीतांची मैफिल त्या ठिकाणी रमली होती.मैफिलीमध्ये अतिशय साधी राहणीमान,साधे कपडे,परिवारासमवेत एक व्यक्ती देशभक्तीपर गीताचा मन भरून आनंद घेताना दिसली.किल्ल्यावर भेटलेल्या अनेक किल्लेदारांनी नंदगिरीच्या या संवर्धनात ज्यांचं मोलाच सहकार्य भेटलं असं वारंवार नाव घेतलं ते “नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव सर”होते.

सरांचे नाव अनेक वेळा श्याम पाटिल व तरुण मुलांच्या कडून ऐकल आहे.पोलीस अधिकारी म्हटलं की,खाकी वर्दी,शिस्त, ठरलेल्या वेळापत्रक,बैठका यात गुंतलेला व्यक्ती . जो आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात,आपल्या भागात गुन्हेगारी कमी करून शिस्त लावण्याचा,शहरात शांतता टिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु,गुरव सर याला अपवाद ठरत आहेत. आपल्या प्रशासकीय सेवेचा जिल्ह्यातील गुन्ह्यांबरोबर जिल्ह्यातील गुन्हेगारी कडे वळणाऱ्या मुलांना योग्य वयात,योग्य मार्गाला लावणं किती महत्त्वाचा असतं ही बाब हेरणारा एक कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक,एक पोलिस अधिकारी आणि छत्रपती शिवरायांचा एक निसिम शिवभक्त त्यांच्या रूपाने नांदेड जिल्ह्याला भेटला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यात घेऊन आपल्या कृतीतून आपण त्यांचा मावळा असल्याचे त्यांनी दाखवून दिले.नंदगिरी किल्ल्यासाठी झटणाऱ्या मुलांना त्यांच्या सहभागाने शंभर हत्तीचे जणू बळच भेटले.गुरव सरांच्या मार्गदर्शनाशिवाय,सहकार्य शिवाय आज हा “नंदगिरी” असा मोकळा श्वास घेऊ शकला नसता हे तितकंच खरं आहे.त्यांच्या स्वतः श्रमदानाने गड किल्ल्यांविषयी त्यांच्या मनात असलेली आवड संवर्धनासाठीची धडपड दिसली. स्वतः गड किल्ल्याला भेटी दिल्या आणि यातूनच त्यांनी “गडकिल्ले” नावाचे त्यांचे स्वलिखित एक पुस्तक सुद्धा आहे. हे श्याम पाटिल यांच्या कडून समजले ही बाब मनाला गुरव सरांच्या प्रति गड किल्ल्यांविषयी असलेल्या भावना क्षणात सांगून जाणारी आहे.
पोलीस प्रशासनात आपले कर्तव्य बजावत असताना समाजाविषयी, समाजातील महापुरुषांविषयी,ऐतिहासिक वास्तू त्यांच्या संवर्धन व जतनासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार नंदगिरी किल्ल्यांच्या किल्लेदारांच्या पाठीशी “पालक” म्हणून उभे राहणे,किल्लेदारांना योग्य मार्गदर्शन करून नव्या दमाने,नव्या रूपात,नव्या पिढीसाठी ऐतिहासिक वास्तू ठेवा गुरव सरांच्या व किल्लेदारांच्या अथक परिश्रमातून आज नांदेडकरांना पुन्हा पहावयास मिळतो आहे. “महापुरुष जाती-जातीत वाटून घेणाऱ्यांसाठी गुरव सर एक चपकार आहेत” असं श्याम पाटील सरांची ओळख करून देताना म्हणाले होते.
अर्थातच गुरव सर प्रशासकीय अधिकारी आहेत आज ते नांदेडमध्ये आहेत उद्या परत कुठल्या तरी जिल्ह्यात जातील परंतु त्यांचे नाव कायम एक नांदेडकर म्हणून एक शिवभक्त म्हणून आमच्या हृदयात असेल “पोलीस प्रशासनात एक असेही शिवभक्त होते” असे आम्ही गर्वाने सांगू ! शिवभक्त म्हणजे फक्त शिवरायांसारखी दाढी ठेवणे, डोक्याला तिळा लावणे नव्हे तर,आपण ज्या क्षेत्रात कार्य करत आहोत त्या क्षेत्रात आपल्या छत्रपती शिवरायांनी दिलेला विचारांचा वसा आणि वारसा आपल्या विचारातून आपल्या कार्यातून दाखवून शिवरायांचे विचार जपणे म्हणजे खरा शिवभक्त!
“नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार वर्दीतला मावळा म्हणजे गुरव सर!”
सर आपल्या विचारांना सलाम!
कालचा रविवार अत्यंत सत्कारणी लागला.जिजा समवेत आम्ही दांपत्यनी नंदगिरी किल्ल्यास काल भेट दिली.या ऐतिहासिक वास्तूचा वारसा पुढच्या पिढीला म्हणजे जिजाला निश्चितच प्रेरणा देईल.नंदगिरी किल्ला काल जिजा ला दाखवला. ती अजिबात दमली नाही छत्रपती शिवरायांचा इतिहास हा आपल्याला कायमच प्रेरणा देणारा आहे जिथे थांबणे,थकणे,परिस्थिती न हरण्याचा, कठीण काळात संघर्षाचा सामना करण्याची ताकद जिजा लाही “छत्रपती शिवराय” या नावातून मिळत राहावी.
आज छत्रपती शिवराय आपल्या मनात आपल्या विचारात, आपल्या कृतीत, जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. महाराजांना ||याची देही| याची डोळा|| बघण्याचे भाग्य या देहाला कधी लाभले नाही, परंतु छत्रपती शिवरायांच्या काळात उभे राहिलेल्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला प्रेरणा,संकटात खंबीर उभे राहण्याची शिकवण, ऊन,वादळ,वारा,संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची प्रेरणा देऊन जातात. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून जिजा सह येणाऱ्या पिढीला गडकिल्ले हे गुगल वरच न पाहता प्रत्यक्ष पाहता यावे, अनुभवता यावे.आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी,लोककल्याणासाठी केलेल्या त्यागाची जाणीव व प्रेरणा त्यांना मिळत राहावी यासाठी गडकिल्ले त्यांचे संवर्धन करणे हे तुम्हा आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे.
नंदगिरी किल्ल्याच्या किल्लेदार परिवारात आम्ही जिजा चा समावेश केला निश्चितच माझी आई सौ.सुनंदाताई जोगदंड जिजाला तिच्या आजी कडून लाभलेला सामाजिक कार्याचा वसा व वारसा ती पुढे चालवल. त्यासाठी आतापासून तिला बाळकडू देण्याची अत्यंत गरज आहे. मुलांना या वयात ध्येय साध्य करण्याची आवड निर्माण झाली की ते, ते वेडे होऊन ध्येय गाठतातच हा इतिहास आहे. हीच शिकवण जिजा ने आत्मसात करावी हीच इच्छा!
जिजा ने ही येणाऱ्या काळात नंदगिरी चा इतिहास माहिती करून घेऊन वर्तमानात व भविष्यात नंदगिरीच्या संवर्धन व जतनासाठी आपले योगदान द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू! आपण राहू ,अथवा न राहो !परंतु आपल्या मातीसाठी रक्त सांडलेल्या पूर्वजांच्या त्यागाची जाणीव मातीशी नाळ जोडल्याशिवाय समजणार नाही त्यासाठी या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने ऐतिहासिक वास्तूचा भूतकाळ अभ्यासून भविष्यात त्याची जतन करण्याची गरज आहे.
✒️ शब्दांकन,,, सौ. सुचिता जोगदंड-वडजे नांदेड.