नांदेड| गावकुशीच्या बाहेर तांडा वस्तीवरील बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी स्वर्गीय वंतराव नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाडी तांड्यावर शिक्षणाची दालने खुली केली. बंजारा समाजाबरोबरच पददलीत समाजाच्या उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय राबविल्यामुळे सर्वांगीण विकास साधता आला. त्यांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्तेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी येथे केले.

जिल्ह्यातील बंजारा समाज व कर्मचारी संघटनेच्यावतीने ना.इंद्रनील नाईक व आ. तुषार राठोड यांचा भव्य नागरी सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मुखेड मतदारसंघाचे आ.डॉ.तुशार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.इंद्रनील नाईक पुढे बोलतांना म्हणाले, बंजारा समाजाच्या ऐक्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल. समाजातील तरुण मुला-मुलींना शिक्षणाचे महत्व पटले आहे.

पालकांनीही त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी जे जे कांही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना दिले. गेल्या 72 वर्षापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा नागपूर येथे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. योगायोगाने माझाही नागपूर येथे राज्यमंत्रीपदाची शपथ झाली. त्यामुळे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सत्तेचा उपयोग सर्वसामान्य पददलितांच्या विकासासाठी करण्याचा प्रामाणीक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ना.नाईक यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल एक दशकानंतर नाईक कुटूंबियांना सत्तेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला म्हणूनच आज मी राज्यमंत्री झालो आहे. आमच्या नाईक कुटूंबियात माझ्या रुपाने राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा बहुमान अजितदादा पवार यांनी मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मंत्रीपदाचा सदुपयोग बंजारा समाजाच्या उन्नतीबरोबरच पददलित, भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी करण्याचा माझा संकल्प आहे. आश्रमशाळेचे आधुनिकीकरण सुरु झाले आहे. प्रत्येक वाडी तांड्यावर डिजीटल आश्रम शाळा निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड-यवतमाळ या जिल्ह्याचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. नांदेडकरांशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध देखील आहेत. त्यामुळे नादेड जिल्ह्यातील बंजारा समाजाशी माझे घरगुत्ती नातेसंबंध देखील असल्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात नातेसंबंध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्वासनही ना.इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले. समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना, मुखेडचे लोकप्रिय आमदार डॉ.तुषार राठोड म्हणाले, मी मुखेड विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे. मला मतदार संघाच्या बाहेर निधी देता येत नाही. बंजारा समाजाने माझाही सत्कार केल्याबद्दल मी ऋणी आहे. मतदार संघाच्या बाहेरील समाज बांधवांना माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन देतो असे ते म्हणाले. यावेळी कल्याण राठोड सर, प्रा.सुरेश जाधव, कपिल राठोड, अमित राठोड. रोहन राठोड यांचेही भाषणे झाली.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंताचा व सरपंचांचा गुणगौरव करण्यात आला. प्रारंभीे प्रास्ताविक डॉक्टर विशाल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन गणपत चव्हाण व संग्राम पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बिडी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास इंजिनिअर शेषराव चव्हाण, देविदास राठोड, माजी जि.प.सभापती अँड रामराव नाईक, रोहिदास जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, मेहरबान राठोड ,प्रफुल राठोड, संजय पवार, गुलाब राठोड, डॉ श्रीराम राठोड, श्रीनिवास जाधव, संजय पवार आदि मान्यवरांची उपस्थिती होती.