हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी गावातील स्वस्त धान्य दुकानात गंभीर अनियमितता व धान्य अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. रेशन वाटपाच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत येऊन लाभार्थ्यांशी उद्धट वर्तन करणे, पीडीएस मशीनवर अंगठा घेऊनही रेशन न देणे तसेच मोठ्या प्रमाणात धान्याचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सिरंजनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी हिमायतनगर तहसीलदारांकडे लेखी तक्रार सादर करून संबंधित रेशन दुकानदारावर व जबाबदार पुरवठा अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 151115000013 (मूळ दुकानदार विजय नागनाथ चिंतावार) हे दुकान सध्या कैलास परसराम डुडुळे यांच्याकडे संलग्न करण्यात आले आहे. मात्र, कैलास डुडुळे हे गावात नियमित येत नसून, कधी आलेच तर मद्यधुंद अवस्थेत येऊन रेशन वाटपात अनियमितता करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे महिलांशी उद्धट भाषेत वाद घालणे, लाभार्थ्यांचे अंगठे घेऊनही धान्य न देणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनामार्फत सांगितले आहे.

ग्रामपंचायतीकडून व ग्रामस्थांकडून या प्रकाराबाबत नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी श्रीमती धोटे यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्यांनी वितरण अहवाल देण्यास आजपर्यंत टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ या तीन महिन्यांचा वितरण अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार, गहू : ६ क्विंटल १ किलो, तांदूळ : १५ क्विंटल ५९ किलो, ज्वारी : ३ क्विंटल ९८ किलो एवढ्या प्रमाणात धान्याचे वाटप झालेले नाही. तसेच हे धान्य दुकानात शिल्लकही नाही. त्यामुळे सदरील धान्याचा अनधिकृतरीत्या अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप सरपंच व ग्रामस्थांनी केला आहे.



सरपंच सौ. मेघा करेवाड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कैलास डुडुळे यांच्याकडे दुकान संलग्न झाल्यापासून आजपर्यंत सखोल चौकशी केल्यास रेशन वाटपातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित रेशन दुकानदारावर तसेच बेजबाबदारपणे वागणाऱ्या हिमायतनगर येथील पुरवठा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर दुकान तात्काळ दुसऱ्या पात्र दुकानदाराकडे हस्तांतरित करून सिरंजनीतील लाभार्थ्यांवरील अन्याय थांबवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.


जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर नाईलाजास्तव संविधानिक मार्गाने अमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी नांदेड यांनाही पाठविण्यात आली असून, शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात हिमायतनगर तहसील प्रशासन काय..? भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

