नांदेड| राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्तींना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे (MJPJAY) पैसे मागील अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने रुग्णालयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांच्या उपचारांचे पैसे वेळेत मिळत नसल्याने उपचारांवरही परिणाम होत असल्याने या योजनेच्या मुख्य उद्देशालाच बाधा पोहोचत आहे.

महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्य व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो गरिबांना व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांनाही वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने २१ नोव्हेंबर २०१३ पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. राज्यातील २८ जिल्ह्यांमधील जवळपास महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांमार्फत ही योजना राबवली जाते.

विशेष म्हणजे मागील जुलै २०२३ मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवत सरकारने एक हजार ३५६ उपचार व एक हजार ३५० रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तालुका पातळीवरील रुग्णालयापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यास मदत झाली. यापूर्वी कुटुंबासाठी खर्चाची मर्यादा ही दीड लाख रुपये होती. त्याचीही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांपर्यंत मर्यादा निश्चित करून दिली आहे. महात्मा फुले (Mahatma Fule) जनआरोग्य योजनेमुळे सर्वसामान्य व्यक्तींवर उपचार होऊ लागले. पण, या सर्व रुग्णांचा खर्च भागविण्यासाठी सरकारने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीला अनेक महिन्यांपासून शासनाकडून पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी रुग्णालयांना उपचारार्थ देय रक्कम देत नसल्याने रुग्णालये आर्थिक अडचणीत सापडली आहेत अशी माहीती येथील अनेक खाजगी रुग्णालयाच्या संचालकाकडून मिळत आहे

जनआरोग्य योजनेचे पैसे मिळत नसल्याने रुग्णांनी या योजनेतून उपचार घेऊच नये, यासाठी येथील काही रुग्णालये प्रयत्नशील असल्याचे दिसते. रुग्णांना या योजनेची माहिती मिळणार नाही किंवा दिलेली माहिती त्रोटक स्वरूपात देण्याकडे कल असून, रुग्णांच्या नातेवाइकांच्या मानसिकतेशी खेळण्याचा प्रकार वाढल्याने या योजनेपासून लोक दुरावण्याची अदृश्य व्यूहरचनाच जणू आखली गेली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे देयके थकीत ः अनेक रुग्णालये आर्थिक संकटात
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे देयके थकीत असल्याने रुग्णालयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेतून लाभार्थी कुटुंबांना आरोग्य विमा कवच मिळते परंतु आरोग्य सेवा पुरविणाऱ्या रुग्णालयांचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे देयके अनेक महीन्यापासून थकीत असल्याने रुग्णालयांची आर्थिक यंत्रणा कोलमडली आहे
या योजनेचे फायदे: ऑर्थोपेडिक्स, सामान्य शस्त्रक्रिया, ईएनटी, स्त्रीरोग, हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, रेडिएशन आणि प्लास्टिक सर्जरी या उपचारांचा समावेश आहे तर या योजनेसाठी पात्रता ही सहज सोपी व सुलभ असून यात पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक यांना आरोग्य कवच पुरविले जाते ..