नांदेड। परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र बंद चा बंदोबस्त शांततेत पार पडला असल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.
दिनांक 10/12/2024 रोजी परभणी जिल्हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केल्याचे निषेधार्थ दिनांक 16/12/2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने नांदेड शहर व जिल्हयात तालुका, गाव इ. ठिकाणी बाजारपेठा प्रतिकात्मक बंद ठेवुन, पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. सदर मोर्चा संपल्यानंतर आयोजकातर्फे मा. जिल्हाधिकारी, मा. उपजिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांना संबंधीत विषयाबाबत निवेदने देण्यात आली.
सदर महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्ताकरीता स्वत मा पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही अपर पोलीस अधीक्षक यांचे सह शहरातील व जिल्हयातील संवेदनशील ठिकाणी भेटी देवुन नागरिक व बंदोबस्तावरील पोलीसांना सदर बंदोबस्त शांततेत पार पाडण्याबाबत सुचना दिल्या. सदर बंदोबस्त करीता पोलीस मुख्यालय येथील 24 स्ट्रायकिंग, 5 आरसीपी, 2 एसआरपीएफ ची कंपनी तसेच जिल्हयातील संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अंमलदार, जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, अंमलदार पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी, अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. जिल्हयात सदर मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडु न देता बंदोबस्त शांततेत पार पाडण्यात आला आहे.
सदर महत्वाचा व संवेदनशील बंदोबस्त हा मा.श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री. डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा.श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली शांततेत पार पाडला आहे. वरिष्ठांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
मा.अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रशासन व पोलीसांच्या परवानगी शिवाय नागरिकांनी कोणतेही मोर्चा, निदर्शने इत्यादींचे आयोजन करू नये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच खोटया अफवा पसरवु नये. सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी पोस्ट करू नये. नांदेड जिल्हा पोलीस दलाचे सर्व बाबींवर बारकाईने लक्ष असुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे.