नांदेडलेख

Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या ‘त्रिवेणी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे होत आहे. यानिमित्ताने कवितासंग्रहाची ओळख करून देणारा डॉ. पृथ्वीराज तौर यांचा लेख देत आहोत.

साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने, त्यांचे भरणपोषण व जोपासणा करण्याच्या दृष्टीने नांदेड शहर मराठवाड्यात अग्रस्थानी आहे. या शहराची स्वतःची स्वतंत्र वाङ्मयीन ओळख आहे, तिला काही शे वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एखाद्याकडे कलेच्या क्षेत्रातील बीजभूमी असेल तर तिला येथे लगेच खतपाणी व पोषक वातावरण मिळते. नांदेडमध्ये राहून लेखन करणाऱ्या साहित्यिकांकडे व त्यांच्या व्यवसायांकडे नजर फिरवली तरी हे सहजच लक्षात येते की या शहराने कित्येकांच्या स्वप्नांना व छंदांना जपून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर ही स्वप्ने साकार करण्यासाठी हातभार लावला आहे.

भिन्न भिन्न व्यवसाय क्षेत्रातून जसे जसे लेखक समोर येत जातात त्याप्रमाणे वाङ्मयाच्या समृद्धीतही भर पडत जाते. वाङ्मय विशिष्ट वर्गापुरते अथवा समूहापुरते मर्यादित न राहता व्यापक होते. एरवी, ‘लेखन वाचन हे काही आमचे काम नाही. तुम्ही तर कवी! आमच्याकडे तेवढा वेळ नाही.’ असे विधान करणाऱ्या व्यावसायिक गटातील अनेक व्यक्ती कवी, कथाकार, प्रवासवर्णनकार, आत्मकथनात्मक लेखन करणारे लेखक म्हणून नांदेडमधून पुढे आले आहेत.

अगदी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात बोलायचे झाले तर, डॉक्टर वृषाली किन्हाळकर, डॉक्टर सुजाता जोशी पाटोदेकर, डॉक्टर जे. जी. वाडेकर, डॉक्टर उर्मिला चाकूरकर, डॉक्टर करुणा जमदाडे, डॉक्टर तेजस्विनी वाडेकर, डॉक्टर नंदकुमार मुलमुले, डॉक्टर हंसराज वैद्य, डॉक्टर किशोर अतनुरकर, डॉक्टर रवींद्र तांबोळी, डॉक्टर अच्युत बन अशी असंख्य नावे मराठी साहित्याच्या क्षेत्रात कवी-लेखक म्हणून स्थिर झाली आहेत. डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांचे नाव डॉक्टर लेखकांच्या या फळीत अग्रस्थानी लिहावे लागेल.

डॉक्टरांना देव संबोधले जाते, रुग्णांना डॉक्टर नवे जीवनदान देत असतात, अशी समाजाची धारणा आहे. आजच्या मूल्य घसरणीच्या व बाजारू व्यावसायिकतेच्या काळातही डॉ व्यंकटेश काब्दे सर अनेकांसाठी ‘देवमाणूस’ आहेत. डॉक्टर म्हणून अत्यावश्यक वेळी काब्दे सर रुग्णांच्या मदतीला धावून जातातच, पण मराठवाड्याच्या विकासासाठी, रेल्वेच्या प्रश्नांसाठी, सामान्यांशी निगडित अनेक समस्यांसाठी गेल्या पाच दशकांपासून ते रस्त्यावर उतरून संघर्ष करत असतात. नांदेड शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक नामवंत संस्थांशी डॉ. काब्दे हे विविध अंगांनी जोडले गेलेले आहेत. विघातक प्रवृत्तीच्या विरोधात आणि विधायक कृत्यांच्या बाजूने ते नेहमीच उभे असतात. समाजातील अन्याय अत्याचारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या या नेतृत्वाचे हृदय मात्र अगदी फुलांचे आहे, आणि म्हणूनच डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची कविता कुसुम हृदयाची कविता आहे. मानवता हाच तिचा एकमेव धर्म आहे आणि विश्वात्मक बंधुभाव हे तिचे सांगणे आहे.

‘उन्मेष’, ‘झेप’ आणि ‘अंतरंग’च्या एकत्रित रूपात आपल्या कवितेची ‘त्रिवेणी’ डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. दोनशे पृष्ठांच्या कवितासंग्रहात एकूण १५५ कविता संग्रहित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात ‘तूच माझा श्वास हो’ अशी प्रार्थना करणारा हा कवी,
‘तूच माझा श्वास होऊन हा रथ चालव
माझे पाय थकले अन हात वाटतात पांगुळले
तूच आता हे धनुष्य आवळून प्रत्यंचा लाव’
असे आर्जव करणारा हा कवी आयुष्य समजून घेतल्यानंतर पडलेल्या मुक्कामी,
‘धरणीच्या गर्भात असतात झरे विखुरलेले
मात्र त्यांचा घ्यावा लागतो शोध
मगच होतो अस्तित्वाचा बोध’
अशी अस्तित्व बोधाची सूत्रे वाचकांच्या हाती ठेवतो.

डॉक्टर काब्दे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे, मानवी जीवन मूल्यांवर असणारा ठाम विश्वास तिच्यातून व्यक्त होतो. जीवननिष्ठा व मूल्यनिष्ठा या कवितेचे प्राणतत्व आहे.
‘हृदये आपुली एकच होती
दुरावली जरी अभेद्य नाती
काळाच्या छेदून कृत्रिम भिंती
या भावांनो अभंग आपुली प्रीती’
हा कवीचा विश्वास आहे. ही कविता केवळ भावकविता नाही. या कवितेची आंतरिक लय ही विचारप्रवाहातून जन्माला आलेली आहे. वैचारिक घुसळणीतून डॉक्टर काब्दे यांच्या कवितेचा जन्म होतो. तिचा उद्रेक सहज स्वाभाविक असला तरी तो कार्यकर्त्याच्या भाषणांच्या जातकुळीचा आहे. आत साठलेली सल बोलून व्यक्त करणारा आहे.
‘कविता उतरते
सर्व घाण पुसून
धुवून
निरामय
नि:संग होऊन’

स्वतःच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया अत्यंत अल्पअक्षरांमध्ये डॉक्टरांनी सांगितली आहे. जेव्हा आजूबाजूला काळोख आहे, रात्र आहे, जेव्हा प्रकाशाचा मागमुस नाही, जेव्हा लेखणीतील शाई संपलेली असते, जेव्हा शाईची दौत तळाशी शुष्क झालेली असते आणि ओलावा देण्यास पाण्याचा थेंबही मिळत नाही, अशाप्रसंगी उषेचे मंगल स्तोत्र गाणारे अमरकाव्य कवीच्या अंतरंगातून उमटून येते. ‘मला मध्यरात्री अमरकाव्य स्फुरते’ किंवा
‘मला झोप येत नाही
मध्यरात्रीनंतर
प्रत्येक क्षणाला
फुटतात धुमारे
अतृप्त आकांक्षांचे
आणि
रंगगंधमयी कल्पनांचे.’

असे कवी लिहितो. समाजात पसरलेल्या काळोखाच्या, अंधाराच्या पार्श्वभूमीवर कवीचे कार्य काय असते? याचे सूचनही ही कविता करते. कवीची सामाजिक बांधीलकी, सर्वसामान्यांप्रति असणारे त्याचे दायित्व याकडेही डॉक्टर काब्दे निर्देश करतात. जीवन म्हणजे टिंब टिंब टिंब, जीवन म्हणजे धाव धाव धाव, जीवन म्हणजे समांतर रेषा हे सामान्यांचे अनुभव डॉक्टर काब्दे यांच्याही पाठीशी आहेत. तथापि-
‘मी काळास झोंबतो
लढ्यात फुलवितो
मनी पेटत्या ज्वाला’
ही जिद्द ते अधोरेखित करतात. कवीच्या रंध्रारंध्रात एक हिरकणी आहे, जी दाही दिशात मनस्वीपणे प्रकाशाची पेरणी करते.

डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या कवितेत मानवी जिद्द वेळोवेळी व्यक्त झाली आहे, जिद्दीपुढे आकाश ठेंगणे हा अनुभव अनेक कवितांतून व्यक्त झाला आहे.
‘बांधतो वाळूत किल्ले पुन्हा पुन्हा
समुद्राला खिजवित
डरत नाही त्याच्या गुरकावण्याला
रात्रीच्या घोंगावण्याला
संपत नाहीत माझ्या आक्रमणाच्या हद्दी
मी आहे जिद्दी.’
हा भाव संपूर्ण संग्रहात पुन्हा पुन्हा व्यक्त झाला आहे. डॉक्टर व्यंकटेश काब्दे हे विविध शैक्षणिक, सामाजिक चळवळीत कायम पुढे राहिले आहेत, चळवळीच्या नेतृत्वाकडे असणारा आशावाद त्यांच्या बहुतेक कवितेतून व्यक्त झाला आहे.

‘त्रिवेणी’मधील अनेक कविता या जीवन प्रवासाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील मनोवृत्तींचा आरसा आहेत. या मनोवृत्ती कधी मुक्तपणे, कधी स्वैरपणे तर खूपदा जगण्याचा ताल पकडून व्यक्त झाल्या आहेत. मानवी जीवन हे असेच असते, कधी संथ तर कधी वेगवान, कधी अवखळ तर कधी शांत, कधी काळजी करणारे तर कधी समजूत घालणारे, डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची कविता मानवाचे समग्र जीवन कवेत घेणारी आहे. तिची लय ही प्रत्यक्ष सामान्य माणसांच्या जगण्याची लय आहे. आणि म्हणूनच ही कविता वाचकांना आपली वाटेल अशी अपेक्षा आहे. ‘त्रिवेणी’च्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना खूप खूप शुभेच्छा. आपला लेखन प्रवास असाच बहरत जावो.

त्रिवेणी ( डॉ. व्यंकटेश काब्दे), बीज प्रकाशन गृह, शेगाव बुलढाणा, प्रथम आवृत्ती ४ सप्टेंबर २०२४, पृष्ठे २०० किंमत ४०० रुपये

डॉ पृथ्वीराज तौर
मराठी विभागप्रमुख
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!