नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर हे प्रभावी व्यक्तिमत्व. बसवंतराव मुंडकर यांचे जीवन हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदानामुळे प्रेरणादायी ठरले आहे.
शेतकऱ्यांसाठी कार्य…
बसवंतराव मुंडकर यांचे प्रमुख कार्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी कृषी सुधारणा, सहकार सोसायटीच्या माध्यमातून, कर्जाच्या सोयी, आणि योग्य दरांसाठी शेतकऱ्यांना संघटित केले. त्यांच्या नेतृत्वात बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध चळवळी सुरू झाल्या, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार मिळाला.
युवा वर्गासाठी प्रेरणा..
बसवंतराव मुंडकर यांचे कार्य तत्कालीन युवांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी आपल्या समवयस्क मित्रांना आणि किशोर व युवकांना सामाजिक आणि राजकीय विविध चळवळीत सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक युवकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. आजच्या युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
गोवा मुक्ती संग्रामातील योगदान..!
गोवा मुक्ती संग्रामात बसवंतराव मुंडकर यांनी अग्रणी राहून सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी बिलोली तालुक्यातील युवकांना एकत्र करून “भारत माता की जय” आणि “गोवा मुक्त झालाच पाहिजे” अशा घोषणा देत मोर्चा काढला. त्यांच्या नेतृत्वात शाळेतील मित्रांनीही या आंदोलनात भाग घेतला, ज्यामुळे गोवा मुक्तीच्या लढ्यात स्थानिक जनतेचा सहभाग वाढला. याबाबत बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक श्री शामराव इनामदार यांनीही त्यांना भाषण कलेत स्वर्गीय बसवंतराव यांच्याकडून त्यांना कसे प्रोत्साहन मिळाले.? गोवा आंदोलनात प्रमुख भूमिका स्वर्गीय बसवंतराव यांनी कशी घेतली.? याबाबत पुष्टी दिली.
आदर्शाचे प्रतीक मात्र उपेक्षित
स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांचे कार्य हे त्यांच्या समाजसेवेच्या आदर्शाचे प्रतीक आहे. त्यांनी देशसेवेने भारावून गोवा मुक्तीसाठी मोठी चळवळ उभी केली. प्राप्त माहितीनुसार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. असे असूनही शासन, प्रशासन आणि सामाजिक, पारिवारिक दृष्टिकोनातून त्यांची म्हणावी तशी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. ही उपेक्षित स्थिती केवळ बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांचीच आहे, असे नाही, तर अनेक खऱ्या अर्थाने देशसेवा करणाऱ्या अनेक देशभक्तांची आहे.
लेखक…चंदा रावळकर, जिल्हा युवा अधिकारी, ( युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली. )