नांदेड| पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा सर्व व्यवसायांच्या निर्मूलनासाठी त्यांना दिनांक 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्याचप्रमाणे, हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट व 10 ऑगस्ट रोजी परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘मासरेड’ चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी, संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता.

अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी, चारही जिल्ह्यांत राबविलेल्या मोहिमेमुळे, दिनांक 1 ते 15 ऑगस्ट, 2024 या पंधरा दिवसांचे कालावधीत, अवैध व्यवसायांविरुद्ध परिक्षेत्रात, सुमारे 1163 केसेस नोंदविण्यात आल्या असून, 2,28,59,556/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू, सिंदी, गुटखा, गांजा, जुगार, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक इत्यादी सदरांखाली केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरुध्द मागील पंधरवाडयात करण्यात आलेली कारवाई

दिनांक 15 ऑगस्ट, 2024 पासून, अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी प्रत्येक पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली, त्यांचे जिल्ह्यात विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित पथकांत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व पाच अंमलदारांचा समावेश असणार असून, या पथकांना कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. सदर पथकांच्या कामगिरीचा आढावा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक हे दैनंदिन पातळीवर घेणार असून, त्यांनी उघडकीस आणलेल्या अवैध व्यवसायांबद्दल पथकांना बक्षिसे देणार आहेत.
तर, ज्या पोलीस ठाण्यांचे हद्दीत अशा प्रकारचे अवैध व्यवसाय आढळून आले, त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करणार आहेत. नांदेड जिल्ह्यात (5), परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी (4), तर हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारची (3) विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी, संबंधित पोलिसांना देऊन, पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा. असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.