किनवट, परमेश्वर पेशवे l परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला किनवट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभर दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसाचार उफाळला होता यात पोलिसांनी अटक केलेल्या एका तरुणाचा पोलीस कस्टडी मृत्यू झाल्यानंतर विविध आंबेडकरी संघटनानी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
या बंदला किनवट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून व्यापाऱ्यानी स्वयंस्फूर्तीतिने दिवसभर कडकडीत बंद पाळला.शासकीय कार्यालय दवाखाने औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. दुपारी आंबेडकरी संघटनांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मागण्याचे निवेदन सादर केले.
यावेळी राज्य सरकार व पोलीस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा तात्काळ शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार धरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मयताच्या कुटुंबीयांना 50 लाख रु अर्थसाहाय्य द्यावे.
निष्पाप आंबेडकरी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, पोलिसांकडून सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करावे व त्यांचे विभागीय चौकशी करावी,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना या प्रकरणात आरोपी करून निलंबित करावे, महिला व पुरुष व तरुणावर जातीद्वेष्यातून दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, पोलिसानी केलेल्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी रिपाई नेते दादाराव कायापाक,विनोद भरणे एड.मिलिंद सर्पे,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे शंकर नगराळे, विजय पोलासवार,प्रवीण गायकवाड, विवेक ओंकार,वंचितचे तालुकाध्यक्ष निखिल वाघमारे,माधव कावळे,मिलिंद कांबळे,निखिल कावळे,राहुल सरपे, एड.सम्राट सर्पे,सुगत नगराळे, दिनेश कांबळे,सम्राट कावळे, गंगुबाई परेकर यांच्यासह आंबेडकरी व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंद दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.