हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे खैरगाव ज. ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेचे काम अत्यंत बोगसरीत्या होत आहे. उंटावरून शेळया हाकणाऱ्या ग्रामसेवकाकडून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. अशी चर्चा व्हॅट्सऍपग्रुप सोशल मीडियावर होऊ लागावी असून, ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या वरिष्ठांनी भेट देऊन या कामाची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत मागील अनेक वर्षपासून विवीध ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ते, स्मशान भूमी शेड, समाज भवन, सभागृह यासह अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. मात्र होत असलेली बहुतांश कामे हि अत्यंत निकृष्ठ आणि अंदाजपत्रकाच्या बगल देऊन केली जात असल्याने त्या कामाची गुणवत्ता ढासळली असून, बहुतांश कामे अल्पवधीतच मातीत मिसळून गेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याचे अनेक उदाहरणे मागील काळात करण्यात आलेल्या मौजे खैरगाव ज. या गावातील विविध विकास कामाकडे पाहिल्यानंतर दिसून येत आहे. तोच कित्ता पुन्हा येथील ग्रामसेवक गिरवीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव ज. या गावात ग्रामपंचायत अंतर्गत संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेचे काम केले जात आहे. लाखो रुपयाच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्यासह सुरु असलेल्या विविध कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. येथील सिमेंट काँक्रेटचे कामे अंदाजपत्रकाला बगल देऊन करत गावातील अशिक्षित जनतेला अंधारात ठेऊन ग्रामसेवक मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करवून शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न करत आहे. अश्या प्रकारे बोगस आणि निकृष्ट सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे कामे केले जात असताना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अभियंता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने मागील अनेक वर्षांपासून या ग्रामसेवकांकडून येथे बोगस कामे करून माया जमविण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचे नागरिक बोलून दाखवीत आहेत.
हि बाब लक्षात घेता हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव ज. ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक यांच्या मागील काळातील आणि सध्या सुरु असलेल्या तांडा वस्ती सुधार योजनेच्या कामाची चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस कामाचे पितळे उघडे पडतील असेही गावातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. अनेकांनी सध्या सुरु असलेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून बोगस कामाचे रस्ता कामाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. सदर रस्त्याचे काम करताना जुन्या सिमेंट रस्त्यावर थेट मिक्स मटेरियल टाकून थातुर माथूर पद्धतीने रस्ता करून देयके काढण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. या प्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव ज. ग्रामपंचायतीच्या रस्त्यासह विविध कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून ग्रामसेवकाच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणीही होऊ लागली आहे.