
उमरखेड, अरविंद ओझलवार। भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी भाडे करारनामा रद्द करणे बाबत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेस दिलेले पत्र हे नजर चूकीने पाठविण्यात आले असून त्यात कुठलीही सत्यता नाही. आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत अहो.


सद्यस्थितीत बॉयलरच्या टेक्निकल टीमचे कार्य व इतर अंतर्गत कामे ही वेगाने सुरू आहेत. तसेच रोलर सुद्धा रिसेलिंग करिता पाठविण्यात आले आहेत. आमचे मार्गदर्शक माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली लवकरच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसंत सहकारी कारखाना शेतकरी हितार्थ हंगामी गाळपास सज्ज असेल.

वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार असल्याची शास्वती कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी दिली. देशमुख हे दि. 18 जुलै रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी भाजपा यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा देखील उपस्थित होते. नजरचुकीने भैरवनाथ शुगर वर्क्स कडून बँकेस गेलेले पत्र काही असंतुष्ट मंडळी समाज माध्यमावर व्हायरल करून वारंवार नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सरपणे केला जात आहे. परिसरातील ऊस उत्पादकांना ते घाबरवीत आहेत.


मात्र मी अगदी ठामपणे सांगतो की, हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांच्या कर्म भूमीतील, त्यांचे नावे असलेला वसंत साखर कारखाना कदापिही बंद पडू देणार नाही. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाचही तालुक्यातील ऊस उत्पादकांना घाबरण्याचे काही कारण नाही. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरलेल्या उसास आम्ही रस्त्यावर पडू देणार नाही. आम्ही बंद अवस्थेत असलेला ‘वसंत’ भाडे तत्वावर सुरू करून शेतकऱ्यांना संजीवनी प्रदान करण्यासाठी हाती घेतलेला शेतकरी संदचा वसा अखंड अविरतपणे सुरू ठेवू.

ना नफा ना तोटा या तत्वावर मागील वर्षीपासून आम्ही वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवीत अहो, शंकडो ऊस उत्पादक शेतकरी आमच्या कार्यप्रणालीवर संतुष्ट आहेत. यापुढेही वसंत सुरू रहावा यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधव, पत्रकार बांधवांच्या सहकायांची अपेक्षा असल्याचे देखील अध्यक्ष अजय देशमुख यांनी यावेळी सांगितले.



