मुखेड, संदिप पिल्लेवाड l तालुक्यातील शेतकरी भिषण पुरपरिस्थितीमुळे पूर्णतः हवालदिल झाले असून शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तरीही शासनाने केवळ हेक्टरी ८५०० रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप करत मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनातून शासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर जोरदार निषेध नोंदवून ११ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. आंदोलन कर्त्यांनी मा. तहसीलदार मुखेड यांना निवेदन देऊन मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी केली.


शेतकऱ्यांना सरसकट विना अट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी ५० हजार मदत तात्काळ द्यावी, पिकविमा सरसकट लागू करून नैसर्गिक आपत्तीच्या चारही ट्रिगरची अंमलबजावणी करावी, लेंडी प्रकल्पग्रस्तांना वाहतूक व बांधकाम भत्ता तातडीने वितरित करावा, लेंडी प्रकल्पग्रस्तांचे माळीण धर्तीवर पुनर्वसन करून पक्की घरे बांधून द्यावीत; तसेच शासन आपल्या दारी कॅम्प लावून पूरग्रस्तांचे कागदपत्रे, प्रमाणपत्रे व आर्थिक मदत द्यावी.



शेतकऱ्यांच्या खात्यांवर होल्ड घालणाऱ्या बँकांवर व बँक मॅनेजरवर फौजदारी कारवाई करावी, नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदाराची बदली करून त्यांच्यावर दफ्तर दिरंगाईची कारवाई करावी, शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या तलाठींवर कठोर कारवाई करावी,पूरग्रस्त भाग म्हणून मुखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, पूरग्रस्त भागातील सर्व घरांचे वीजबिल मोफत करावे, पुरामुळे पडझड झालेल्या घरांसाठी व विहीर उभारणीसाठी भरीव आर्थिक मदत द्यावी या विविध मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आजच्या रास्ता रोको आंदोलनानंतर येत्या काळात संपूर्ण बंद उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,गिरीधर पाटील केरुरकर,व्यंकट इंगळे,बालाजी इंगळे,प्रशांत देशमुख,किरण बोडके,संतोष डाकोरे,श्याम डाकोरे,शंकर तरटे,रामदास पाटील,दत्तात्रय कदम,व्यंकट डूमणे,केरबा शिंदे,अर्जुन कदम,तुकाराम डाकोरे,विठल गायकवाड,केरबा गाढवे,व्यंकट भायदे,रमाकांत पाटील जाहुरकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


मुखेड तालुक्यात सलग तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबरोबर अनेक गावे १००% नुकसान झाले असून अनेक घरांचे नुकसान झाले यांना तत्काळ शासनाने मोबदला द्यावा आणि हेक्टरी ५०००० रुपये शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आगामी काळात मुखेड तालुक्यात कोणत्याही लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही.
–– बालाजी पाटील ढोसणे
(शेतकरी पुत्र)


