Brijesh Singh : पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे – ब्रिजेश सिंह
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘एआय परिषद २०२६’मध्ये ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन

मुंबई|पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची मर्यादा आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’ चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी उपस्थित होते.

ब्रिजेश सिंह म्हणाले की, मानव इतिहासात ज्ञानाचा प्रसार छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलला. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता, तर डिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल; मात्र स्वयंचलित होऊ शकणारी अनेक कामे एआयमुळे स्वयंचलित होणार, हे वास्तव असल्याचे त्यांनी नमूद केले.


आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत असून काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत आहेत. बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा यांसारख्या क्षेत्रांतील अनेक बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

“तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो,” असे सांगत पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पत्रकारांसाठी ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एआयमुळे बातम्या अधिक वेगवान, रिअल-टाइम आणि वैयक्तिकृत स्वरूपात उपलब्ध होत आहेत. “अटेन्शन इकॉनॉमी”च्या युगात वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जाते. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे विविध पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांपर्यंत पोहोचवतात आणि त्याचा परिणाम अभ्यासतात, असेही त्यांनी सांगितले.
एआय तंत्रज्ञानामुळे माहितीचे प्रमाण प्रचंड वाढले असले तरी विश्वासार्हतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. एआयमध्ये कधी कधी ‘हॅलुसिनेशन’मुळे चुकीची माहिती तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे एआय-निर्मित सामग्रीची अंतिम जबाबदारी संपादकीय स्तरावरच राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय भाषांबाबत एआयची मर्यादा अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, बहुतेक मोठी लँग्वेज मॉडेल्स पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने मराठीसह भारतीय भाषांचा डेटा तुलनेने कमी आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि डेटा सार्वभौमत्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एआयमुळे “डिप फेक” तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट-चेक प्रणाली सुरू केली असून संशयास्पद व्हिडिओ किंवा माहितीची पडताळणी करून ती खरी की खोटी हे तपासता येणार आहे.
याशिवाय पाश्चात्त्य देशांमध्ये विकसित होत असलेल्या ‘प्रोव्हेनेन्स’ तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, फोटो किंवा व्हिडिओमध्ये डिजिटल स्वाक्षरी (डीएनए सिग्नेचर) समाविष्ट करून मूळ सामग्रीमध्ये बदल झाला आहे का हे सहज ओळखता येते. भारतातही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेच्या कामकाजात मोठे बदल झाले आहेत. पूर्वी बातमीसाठी मोठी टीम लागत होती; मात्र आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी कामे करू शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआयसारख्या नव्या साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात शैलेंद्र शिर्के यांनी एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान पत्रकारांना अशा परिषदांमधून मिळते, असे सांगितले. राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असून शासनाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी केले. यावेळी ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते परिषदेतील वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.



