हदगाव/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आष्टी येथील डिजीटल मीडिया परिषदेचे हदगाव तालुका ऊपाध्यक्ष तथा पत्रकार गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध वाळू साठा असल्याने तहसीलदार हिमायतनगर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर वाळूचा लिलाव शुक्रवार दिनांक 06 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास होणार होता. सदर वाळू गौरगरीब घरकुल लाभार्थ्यांना वितरित होणार असल्याची माहिती जाणून घेण्यासाठी आणि वृत्त संकलन करण्यासाठी गेले होते. दरम्यान वाळू माफियाने त्यांना मारहाण करून दोन्ही मोबाईल फोडून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी वीरसणी हिमायतनगर शिवारात घडली आहे.


याबाबत गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मी दिनांक 6 जून 2025 रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील मध्ये हिमायतनगर तहसील अंतर्गत रेती साठ्याची माहिती घेऊन व माहितीचा अधिकार देऊन विरसनी मार्ग हदगावकडे जात असताना वीरसनी येथे गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठा होता. तो तहसीलने जप्त करून त्याचा लिलाव आयोजित केला होता. या कार्यवाहीची माहिती जाणून घेण्यासाठी बातमी घेण्यासाठी गजानन जिद्देवार गेले होते. त्या ठिकाणी सात ते आठ ट्रॅक्टर, पोलीस पाटील, तलाठी, व इतर जनता मोठ्या प्रमाणात हजर होती. तहसीलदार जाय मोक्यावर येणार म्हणून प्रतीक्षा करत होते.

तेवढ्यात जिद्देवार हे वाळूच्या ढगाचे फोटो काढत असताना तिथे हजर असलेला वाळू माफिया तथा शिवसैना शिंदे गटाचा पदाधीकारी शेख अफरोज यांनी जिद्देवार यांना येऊन तूच आमच्या वाळूची तहसीलदार मॅडम कडे तक्रार करणारा आहेस का ? म्हणून बेदम मारहाण केली. तसेच सोनू देवसरकर व इतर अज्ञात आठ ते दहा जणांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शेख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोन्याची चैन, काढून घेतली. झटपट दरम्यान माझ्या खिशातील पाच हजार रुपये कुठे पडले की ? तसेच मी चित्रीकरण केलेले माझे मोबाईल फोडले असल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिली असल्याचे सांगितले.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.रं.न 120/2025 कलम 119,(1) 118,(1) 115,(2) 351,(2)189,(2) 199,(2) 191,(2) 191,(3) 190 ,324,(4) 324(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मद्दे हे करत आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील एकाही रेतीघाटचे लिलाव झाले नाही. असे असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अल्पवहडीत मालामाल होऊ पाहणाऱ्या काही रेती माफियांनी मौजे विरसणी, कामारी, जवळगाव, पिंपरी, दिघी, घारापुर, खडकी, डोल्हारी, धानोरा, पळसपूर, वारंगटाकळी, मंगरूळ, कोठा, हिमायतनगर रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात विना परवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून हजारो ब्रास वाळूचा साठा महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे. परिणामी गरजू लाभार्थीना अव्वाच्या सव्वा दराने रेती खरेदी करावी लागते हि वस्तुस्थिती आहे.
आरोपी अद्याप ही फरार
मराठी पत्रकार संघ संलग्नित डिजीटल मीडिया परिषदेचे हदगाव तालुका उपाध्यक्ष गजानन जीदेवार यांच्यावर भ्याड हल्ला करणारे आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास यावा. सदर घटनेचा निषेध नोंदवून मराठी डिजिटल पत्रकार संघाचे हदगाव तालुकाध्यक्ष मारुती काकडे ,महेंद्र धोंगडे व तसेच मराठी पत्रकार संघाचे वतीने पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.