धर्माबाद। कुशाग्र बुद्धिमत्ता पैशाने विकत घेता येऊ शकते पण प्रामाणिकता कशी विकत घेणार? असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांनी केले.


ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नागनाथ नोमुलवार हे होते तर म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे,साहेबराव जाधव, जी.पी. मिसाळे उपप्राचार्य जोशी,पांडुरंग कोटूरवार, विजया काचावार,डॉ. जाधव यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.


मुंडकर पुढे म्हणाले की, महाविद्यालयाच्या, प्राध्यापकांच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या बळावर कुशाग्र बुद्धिमत्ता निर्माण करता येऊ शकते,बौद्धिक कौशल्य विकसित करता येऊ शकतात. कुशाग्र बुद्धिमत्ता गरजेनुसार पैशाच्या बळावर विकत घेता येऊ शकते, मात्र प्रामाणिकता कशी विकत घेणार? म्हणून बौद्धिक विकासाबरोबरच तसेच शिक्षणाबरोबरच प्रामाणिकतेचे शिक्षण आणि संस्कार ही काळाची गरज असल्याचे यावेळी श्री गोविंद मुंडकर यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.


यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता, हैदराबाद मुक्ती संग्रामातील पत्रकारांचे योगदान, हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या जीवनावर अंशतः प्रकाश टाकण्यात आला.यावेळी आदर्श प्राचार्य पुरस्कार गोविंद मुंडकर यांच्या हस्ते प्राचार्य कणसे यांना देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील समाज सुधारक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



