हिमायतनगर,अनिल मादसवार| जय श्रीराम… बजरंग बली की जय…पवनसुत हनुमान कि जय… हर हर महादेव…. नामाचा जयघोष करत हजारो महिला पुरुष भाविकांच्या साक्षीने पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत पवनसुत हनुमान मंदिराचा लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा तसेच शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक १६ सोमवारच्या शुभमुहूर्तावर थाटात संपन्न झाला. यावेळी वसमत येथील थोरला मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. 108 वेदांताचार्य दिगंबर स्वामी शिवाचार्य महाराज यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.



हिमायतनगर (वाढोणा) शहरातील प्रसिद्ध असलेल्या बजरंग चौक परिसरातील पवनसुत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी येथील युवकांनी साकडे घातल्यानंतर माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी मंदिराच्या बांधकामासाठी २० लक्ष रुपयाचा निधी दिला होता. यातून मंदिराचा जीर्णोद्धार होऊन कायापालट करण्यात आला. तसेच मंदिरातील टाइल्स आणि इतर सुशोभीकरणासाठी आमदार जवळगावकर यांनी १० लक्ष रुपयाचा निधी दिला. मंदिराचे काम सर्वानुरूप पूर्ण झाल्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना वसमत येथील थोरला मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. 108 वेदांताचार्य दिगंबर स्वामी शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत दिनांक 16 रोजीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटात करण्यात आली. त्यानंतर मंदिराचा लोकार्पण सोहळा हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, आमदार जवळगावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.



तत्पूर्वी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने ढोल तश्या आणि ताल मृदंगाच्या गजरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये शेकडोच्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवली. मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी जवळपास 15 जोडप्यांनी होम हवन यज्ञात सहभाग घेतला. अंदाजे सात पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत होम हवन यज्ञ सोहळा संपन्न झाला. दुपारी २ वाजता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर व शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ ज्योतीताई वाघमारे यांनी पवनसुत हनुमान मंदिरास भेट देऊन हनुमंतरायाचे दर्शन घेतले. मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या बजरंगबली हनुमान मूर्तीच्या दोन्ही बाजूने गणपती बाप्पा विराजमान असल्याचे मंदिर अत्यंत सुंदर बांधण्यात आल्याचे सांगून मंदिर कमेटी व संबंधित ठेकेदाराचे कौतुक केले. यावेळी दूर दूर वरून भाविकांनी उपस्थिती लावून हनुमंतराय, गणपती बाप्पासह स्थापन करण्यात आलेल्या नंदी शिवलिंगाचे दर्शन घेतले.



पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यापूर्वी या भागातील महिलांनी हजारो दिप लावून दीपोत्सव सोहळ्यात सहभाग घेतला. यामुळे मंदिर परिसर झगमगून निघाल्याचे पहावयास मिळाले. लोकार्पण नंतर पवनसुत हनुमान मंदिराच्या निर्मितीत ३५ वर्षांपूर्वी श्रमदान करून योगदान दिलेले सध्या तेलंगणा कमरेड्डी येथे वास्तव्यास असलेले गोपाळराव बाबुराव गोजे यांच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात सहयोग देणाऱ्या व गणेश मंडळाच्या युवकांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच ज्यांनी ज्यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला त्यांचं देखील कौतुक त्यांनी केलं. यावेळी पवनसुत हनुमान मंदिर कमिटीच्या पुढाकारातून पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपन्न होताच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



