हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या रेतिघाटावरून कोणताही लिलाव झालेला नसतांना विनापरवाना अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून चोरीच्या पद्धतीने वाहतूक केली जाते आहे. रेतीमाफियांच्या रेती चोरीच्या गोरखधंद्याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोचविली जात आहे. याकडे महसूल प्रशासन व बैठे पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यवरण प्रेमी नागरिकांतून केला जातो आहे. नुकतेच सरसम परिसरात दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करत लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे, मात्र मुख्य रेती माफियाकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना अभय दिलं जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकातून केला जात आहे.
उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे घारापुर, रेणापूर, विरसनी, पळसपुर, दिघी, डोल्हारी, कोठा, कोठा तांडा, धानोरा, वॉरंगटाकळी, तसेच सरसम, आंदेगाव, टाकराळा परिसरातील नाल्यातून संबंधित महसूल विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून वाळू, रेतीचा बेकायदेशीरपणे उपसा केला जात आहे. शासनाच्या उत्खनन नियमांचे उल्लंघन करत वाळू, मुरूम आदींचे उत्खनन करून गरजूंना अव्वाच्या सव्वा दारात विकून अल्पावधीतच मालामाल होण्यासाठी काहीजण धडपडत आहेत.
हिमायतनगर तालुका दंडाधिकारी कार्यालयात असलेले महसूल अधिकारी या चोरीच्या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे. छोट्या वाहनांवर कार्यवाही करून राजकिय वरदहस्त असलेल्या बड्या रेतीमाफीयांना अभय देण्याचे काम महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने रेती वाहतूक करणारे दोन वाहने पकडून त्यांना लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे.
मात्र पैनगंगा नदीकाठावर असलेल्या विरसनी, कोठा, धानोरा, वारंगटाकळी, दिघी, घारापुर, रेणापूर, डोल्हारी, सिरपल्ली, पळसपूर आदी परिसरात होत असलेल्या अवैध रेती माफियावर कोणतीच कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न पर्यवरण प्रेमी नागरिक विचारात आहेत. पैनगंगा नदीकाठच्या रेती घाटावरून उघडपणे नदीपात्रातुन वाळूचा उपसा होतो आहे. रेतीमाफियांच्या कारभाराकडे महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरात अवैद्य रेतीची खुलेआम वाहतूक केली जात आहे.
वाहन चालक कुणाची पर्वा न करता मुख्य रस्त्याने भरधाव वेगात ट्रॅक्टर नेत्यामुळे अपघातांचीही शक्यता निर्माण झाली आहे. रेतीचा ट्रॅक्टर अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तिंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालक व मालकांवर कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलात वाढ करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतुन केली जाते आहे.