माहूर, कार्तिक बेहरे| सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुलजी गुप्ता सनदी अधिकारी (Rahul Gupta IAS Officer) यांची सदिच्छा भेट घेऊन मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांवरील विविध समस्यां सोडवण्याची विनंती करण्यात आली.

वेळेत हजेरी पत्रक न देणे,वेतन चिट्ठी न देणे, किमान वेतन कायद्यानुसार पूर्ण वेतन व पगार वाढीच्या फरकाची रक्कम पूर्ण न देता संगनमताने विविध शासकीय संविधानिक देय रकमेवर डल्ला मारणे, तक्रारदार कामगारांना आकसाने कामावरुन कमी करणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे, कोर्ट केसच्या कामगारांना कमी करणे इत्यादी समस्यां सांगितल्या असता संघटनेने तशी लेखी तक्रार द्यावी त्यावर लवकरच सर्व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, अधीक्षक अभियंता व मानव संसाधन अधिकारी यांचे समक्ष मीटिंग घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

राज्याचे ऊर्जामंत्री यांनी सूचना देऊन देखील वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी अंमलबजावणी करत नाही. कंत्राटदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने ते मनमानी करून कामगारांची दरमहा आर्थिक लूट करतात. हे अन्यायग्रस्त चित्र आता थांबले पाहिजे ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. या भेटीच्या शिष्ट मंडळात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उप सरचिटणीस राहुल बोडके, केंद्रीय संघटन मंत्री तात्यासो सावंत, अशोक खंडागळे, पांडुरंग खेडेकर,नरेंद्र दिनकर, बालाजी नांदूरकर ज्ञानेश्वर वाघ, जितेंद्र बिराजदार, रमेश बेढे, परमेश्वर गाडेकर, आदिनाथ पडुळ, संतोष गायकवाड,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
