नांदेड| शहरातील आनंदनगर भागात बुधवारी सकाळच्या रामप्रहरी ५ वाजच्या सुमारास भिषण आग लागली असून, या आगीत हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी आणि ऑइल शोरूम जळाले. या आगीच्या घटनेत एका खासगी हॉस्टेलमधील ७० मुली अडकल्या होता. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने दाखल होऊन सर्व मुलींना सुखरूप बाहेर काढले. यामुळे ७० मुलींचा जीव थोडक्यात वाचला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील आनंदनगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेदरम्यान मुख्य रस्त्यावर असलेल्या नैवेद्यम हॉटेल व जीव्हीसी मोबाईल शॉपीला आग लागली. या आगीने काही वेळात रौद्ररुप धारण केले. यात नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या खासगी हॉस्टेललाही आगीने वेढले. इमारतीच्या डाव्या बाजूस असलेल्या जीव्हीसी मोवाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली. या दुर्घटनेत मोवाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर जळून खाक झाले. मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरूम हे मोठे दुकान होते. या दुकानाचेही शटर व समोरील सिलिंग आगीमध्ये जळाली.
घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच एम.एच. २६ सीएच १४७९ क्रमांकाच्या बंबासह अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, कांवळे, साजीद, गीते, शिंद, नरवाडे हे अग्निशमन दलाचे जवान तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझवत असतांना अग्निशमन दलाच्या जवानांनी हॉटेल नैवेद्यमवरील वरच्या मजल्यावर अडकलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमधून तब्बल ७० मुलींची तातडीने सुखरूप सुटका केली. यामुळे या सर्व मुलीचा जीव थोडक्यात वाचला.
दरम्यान हॉटेल नैवेद्यममधील ८ गॅस सिलिंडरही वेळीच बाहेर काढण्यात आले. यामुळे स्फोट झाला नाही आणि पुढील दुर्घटना टळली. या भिषण आगीत जीव्हीसी मोबाईल शॉपीतील १५ ते २० लाख रुपयांचे साहित्य तसेच महालक्ष्मी ऑईल शोरूममधील ३० ते ४० लाख रुपयांचे आगीपासून वाचविले. परंतू हॉटेल, हॉस्टेल, मोवाईल शॉपी व आईल शो रूमचे लाखों रूपयांचे आगीत नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. मुख्य रस्त्यावर असलेल्या या सर्व प्रतिष्ठांना आग लागली तेव्हा दुरपर्यंत आगीचे लोट सुरूच होते. या कारमगिरीबद्दल मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधु यांच्यासह शहरातील नागरिकांमधून अग्रिशमन दलाचे कौतुक होत आहे.