नांदेड| जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या अंगावरील व पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण ५,६८,२९० रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत ३० ते ५० वयोगटातील काही महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान पूनम आतीष हातवळणे (वय २९), राखी हीरा हातवळणे (वय ४०), शन्नू राजू हातवळणे (वय ५०), महेश दिनाजी गायकवाड (वय ३८, तृतीय पंथी), सर्व रा. शांतीनगर, इतवारा, नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 11.07 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तर 06 तोळे चांदीचे दागिने असे एकूण ५,६८,२९० रुपये किमतीचे आढळून आले. अधिक चौकशीत त्यांनी मुखेड, हदगाव, कंधार, बिलोली, अर्धापूर व लोहा येथील बसस्थानकांवर बसमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली दिली.


या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात आली असून, सर्व चारही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन मुखेड येथे ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी विशेष कौतुक केले आहे.


