किनवट, परमेश्वर पेशवे, नंदगाव तांडा l किनवट तालुक्यातील जलधारा केंद्रस्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि 21 व 22 जानेवारी 2025 रोजी केलेले आहे. दि. 21 जानेवारी 2025 रोजी या महोत्सवाचे उद्घाटन मा. गंगाधर राठोड गटशिक्षणाधिकारी किनवट* यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी मानवी जीवन कौशल्य विकसित करण्याचे प्रभावी साधन म्हणजेच खेळ व क्रीडा होय, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास अभ्यासाबरोबरच खेळ,क्रीडा व कलेचे ही तेवढेच महत्त्व असल्याचे त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात म्हटले.

या कार्यक्रमात त्यांच्या समवेत शिवनी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.संजय कराड ,जलधारा केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक हमदे, थारा केंद्राचे केंद्रप्रमुख सुकलवाड सर, केंद्र मुख्याध्यापक किशोर कावळे, नंदगाव तांडा ग्रामपंचायतचे सरपंच मा. देविदास मोहन जाधव, उपसरपंच इंद्रसिंग आडे, पोलीस पाटील रवींद्र राठोड ,माजी सरपंच मोहन जाधव ,माजी सरपंच सुनील आडे, माजी सरपंच बालाजी रामा राठोड ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरधारी शंकर पवार व प्रतिष्ठित नागरिक मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काळे यांनी तर प्रस्ताविक केंद्रप्रमुख अशोक हामदे यांनी केले.

जलधारा केंद्रातील 12 घटक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व अंदाजे 400 खेळाडू विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पहिल्या दिवसाचे सर्व सामने केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीपणे पार पडले.
