नांदेड| प्रशासकीय सुधारणांसाठी मुलमंत्र ठरू पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Raut) यांनी आज आढावा घेतला. महसूल विभागाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख तसेच सर्व उपविभागीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी त्यांनी या मोहिमेत मागे राहिलेल्या विभागांना सक्त निर्देश देत निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट केले. प्रामुख्याने वेबसाईटचे अद्यावतीकरण, इज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, तक्रार निवारण, सोईसुविधा, गुंतवणूकीस प्रोत्साहन, क्षेत्रिय भेटी या 7 सूत्रांवर त्यांनी भर दिला. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
