वंदे भारत : स्वप्न सत्यात उतरले!
रात्री ११.३० वाजता आम्ही जम्मू रेल्वे स्टेशनवर हमसफर एक्सप्रेसने उतरलो. एक काळ होता, जेव्हा हमसफर सुरू झाली तेव्हा तिच्या आधुनिक कोचेस, डिझाईन, सजावट आणि सेवांमुळे मी तिच्यावर एक स्वतंत्र लेख लिहिला होता. पण आज… तीच हमसफर पार उडाळलेली, थकलेली वाटली. नवीन कोचेस लावण्याची गरज भासते आहे.स्टेशनबाहेर आलो आणि पावसाने जोर धरलेला. मुसळधार सरी कोसळत होत्या. जड सामान वाहण्यासाठी प्रति लगेज ₹७५ प्रमाणे कुली ठरवले. दोन बसेस तयारच होत्या, पण ५० किमीचे अंतर पार करताना पावसामुळे आम्हाला दीड तास लागला.कटरा रेल्वे स्टेशनवर पोहचून वेटिंग हॉलमध्ये दोन तास विश्रांती घेतली. रोजप्रमाणे पहाटे ५ ला डोळे उघडले. पाऊस थांबलेला होता. त्यामुळे वॉकिंग व प्राणायाम करता आले. थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे सगळा शीण, प्रवासाचा थकवा निघून गेला. (From Amarnath Cave – Part 4 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur)


केल्याने होत आहे रे…
पण खरी चिंता होती ती, वेटिंग लिस्टवरील १९ यात्रेकरूंविषयी. वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या दिवशीच आम्ही या गाडीची आरक्षणे केली होती. ९३ यात्रेकरूंपैकी ३६ जण वेटिंगवर होते. खा. अशोकरावजींचे दिल्लीतील पीए सुरेश भोसीकर यांच्या सहकार्याने बऱ्याच तिकिटांचे कन्फर्मेशन झाले, मात्र चार्ट तयार झाला तेव्हा ९ जण अजूनही वेटिंगवरच होते.त्या ९ जणांची तातडीने बैठक घेतली. परिस्थिती प्रामाणिकपणे स्पष्ट केली. जर वंदे भारतने जाता आले नाही, तर उधमपूरवरून पर्यायी बसेस तयार होत्या. पण त्या यात्रेकरूंच्या डोळ्यात स्पष्ट निराशा दिसत होती. त्यामुळे, संपर्क, प्रयत्न, बोलणी… सगळी यंत्रणा राबवली.आणि अखेर, त्या नऊ जणांना सुद्धा वंदे भारतमध्ये सीट मिळवून दिली.प्रामाणिक प्रयत्न केले कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय आला. हीच खरी यात्रा, फक्त डोंगर चढणे नव्हे, तर प्रत्येकाच्या मनात उतरणे.अमरनाथ यात्रेकरूंचा ‘वंदे भारत’चा अनुभव, वेग, सुविधा आणि अभिमानाचं मिश्रण.


खास काय वाटलं यात्रेकरूंना?
कटऱ्याहून श्रीनगरकडे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करताना आमच्या अमरनाथ यात्रेकरूंनी एका वेगळ्याच स्तराचा अनुभव घेतला. संपूर्ण भारतात नावाजलेली ही गाडी प्रत्यक्षात कशी असते, याचा अनुभव घेण्याची ही पहिलीच वेळ होती अनेकांसाठी. काही जणांनी तर अगदी लहान मुलासारखं खिडकीतून पाहत प्रवासाचा आनंद घेतला.


“हे खरंच इंडियन रेल्वे आहे का?”
असं म्हणत ज्येष्ठ यात्रेकरू अचंबित होत होते. वातानुकूलित कोच, स्वच्छता, मऊ आसनं, स्वयंचलित दरवाजे हे सगळं प्रथमच पाहताना त्यांना वाटत होतं की आपण परदेशी रेल्वे प्रवासात आहोत. ट्रेन सुरू होताच दिली जाणारी वेलकम ट्रे, नंतर गरमागरम नाश्ता आणि चहा /कॉफ़ी, ताजे वृतपत्र हे सगळं अतिशय आधीच समन्वय साधून व्यवस्थित करून ठेवले होते. त्यामुळे प्रत्येक जण म्हणत होता:
“आता तर विमानात बसण्याची गरजच वाटत नाही.”

प्रवास नव्हे, एक ‘स्मरणीय क्षण’,
उंच टेकड्यांमधून आणि निसर्गरम्य डोंगरदर्यांतून ट्रेन जात होती, तेव्हा सर्वांनी मोबाईल कॅमेरे सरसावले. खिडकीबाहेर दिसणारे दृश्य आणि आत मिळणारा शाही अनुभव… एक अविस्मरणीय संगम!पुढचं टार्गेट ठरलं, अनेक यात्रेकरूंनी ठरवलं की आता भारतात जिथे जिथे वंदे भारत आहे, तिथे जायचं. काहींनी आपल्या कुटुंबासाठी सुद्धा खास वंदे भारत प्रवासाची योजना सुरू केली.
तब्बल २२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरच्या दिशेने धाव घेतली आणि हजारो यात्रेकरूंचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. कटरा ते श्रीनगर हा १० तासांचा खडतर प्रवास आता केवळ ३ तासांत पूर्ण होत आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी हा एक वरदानच ठरला आहे. ७ जून २०२५ पासून सुरु झालेली ही सेवा म्हणजे केवळ रेल्वे नव्हे, तर भारताच्या प्रगतीचा, आत्मनिर्भरतेचा आणि दुर्गम भूभागालाही देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या जिद्दीचा एक ठळक पुरावा आहे.
याच वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत आमच्या ९३ पैकी सर्वच यात्रेकरूंचा अनुभव हा एक अविस्मरणीय पर्वणी ठरली. कटऱ्याहून सकाळी ८:१० ला निघालेली ट्रेन नेमकी ११:१० ला श्रीनगरला पोहोचली. कोणी खिडकीतून चिनाब ब्रिजचं अप्रतिम दृश्य टिपलं, तर कोणी अंजी ब्रिजच्या अद्भुत स्थापत्यशास्त्रावर स्तिमित झाले. एकंदरीत, ही ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचं अभिमानास्पद रूप होतं – वेळेची बचत, प्रवासातील आराम, सुरक्षितता आणि सौंदर्याचा संगम!त्यामुळे मी नरेंद्र मोदी यांचे मोठ्या आवाजात आभार मानले. डब्यातील इतर यात्रेकरूंनी देखील टाळ्यांचा कडकडाट केला.
आता ही सेवा पुढे नवी दिल्लीपर्यंत जोडण्याचा सरकारचा मानस असून, ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ दरम्यान दिल्ली-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसही सुरु होणार आहे. अंजी केबल ब्रिज व चिनाब आर्च ब्रिजसारख्या अभियांत्रिकी चमत्कारांमुळे रेल्वेने हिमालयाच्या काळजावरून प्रवास शक्य झाला आहे. आता केवळ पर्यटनच नव्हे, तर कृषी व व्यापारालाही गती मिळाली आहे. चेरी, सफरचंदसारखी लवकर नाशवंत फळं आता थेट दिल्लीसारख्या बाजारात वेळेवर पोहोचत आहेत. वंदे भारतने नुसता प्रवास सोपा केला नाही, तर एक संधी दिली, काश्मीरला भारताच्या हृदयाशी जोडण्याची. (क्रमशः)


