“प्रवास मनाचा… भोलेनाथाच्या ओढीचा!”
आज तो दिवस उजाडला… ज्याची प्रतीक्षा अखंड तयारीनंतर अखेर संपली होती. पहाटे पाच वाजता डोळे उघडले. बाहेर अजूनही पन्हाळलेले आकाश, पण अंतर्मनात उत्साहाची ऊब. सामानाची एकदा पुन्हा नीटशी पाहणी केली. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट, रेल्वे तिकिटं आणि यात्रा परची, त्या माझ्या जवळच होत्या.कधी काळी एका कुटुंबाने यात्रा परची घरी विसरल्यामुळे दर्शनाच्या वेळेस आम्हाला अक्षरशः देव आठवले होते.त्या अनुभवाने शिकवले “भक्तीचा प्रवास जितका भावनिक, तितकाच संयमीही असतो.”


प्रस्थानाची शुभ पहाट
प्रातःस्मरण झालं. अपेक्षेप्रमाणे आज मॉर्निंग वॉकला मी एकटाच होतो.नंतर घरात पूजन केलं, मनोमन देवाचा आशीर्वाद घेतला.गल्लीतील पुरातन सोन्या मारुती मंदिर आणि सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर इथं दर्शन घेऊन समर्थांपाशी एक साकडं घातलं “बाबा, यावर्षीची यात्रा सुद्धा तूच पूर्ण करून घे…” प्रत्येक वर्षी यात्रेनंतर महाप्रसाद स्वामी समर्थ मंदिरातच देतो.यंदा त्यासाठी रविवार, ३ ऑगस्ट ही तारीख आधीच बुक केली होती.

स्टेशनवरचा उत्सव – ‘बम बम भोले’ चा जयघोष
स्टेशनवर पोहोचलो तेव्हा घड्याळाचा काटा 9.30 वर स्थिरावलेला.तेवढ्यात कथयी रंगात न्हालेलं एक भक्तिरसात भिजलेलं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहिलं – सर्व यात्रेकरू कथयी टि शर्टमध्ये, हात जोडलेले, ओठांवर ‘बम बम भोले!’ चा गजर…गेल्या काही वर्षांपासून आमचे आध्यात्मिक आधारस्तंभ नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंघजी यांची उपस्थिती न मिळाल्याने एक हुरहूर होती.म्हणून भाऊ राजेशसिंह त्यांना घेण्यासाठी स्वतः गेला. दहा मिनिटांत ढोल-ताशांच्या गजरात नांदेड भूषण बाबाजींचं आगमन झालं, आणि भक्तिरसाने स्टेशन फुलून गेलं.

बाबाजींच्या हस्ते सर्व यात्रेकरूंना सिरोपाव, मोत्याची माळ, प्रसाद वाटप करण्यात आले.हे केवळ भेटवस्तू नव्हत्या, तर त्या एका आशीर्वादाने भारलेल्या साक्षी होत्या.यावेळी अनेक मित्रांनी पुष्पवृष्टी करत यात्रेकरूंवर प्रेमाचा वर्षाव केला.यात्रेदरम्यान अन्नसेवा करणाऱ्यांचा बाबाजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण साहेब आणि खा. डॉ. अजित गोपछडे साहेब यांचे प्रतिनिधी, नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सुभाष बंग,श्याम हुरणे, डॉ. अजयसिंह ठाकूर, द्वारकादास अग्रवाल, सतीश सुगनचंदजी शर्मा, स्नेहलता जायस्वाल,ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सुभाष बंग ,सरदार जागीरसिंह अमृतसर, हास्य कवी प्रताप फौंजदार, प्रदीप शुक्ला भोपाळ,भुसावळचे ऍड.निर्मल दायमा,बापू कदम व संभाजीनगरच्या कृष्णा कदम,दत्ता खानजोडे अशी सेवाभावी व्यक्तिमत्वं म्हणजे यात्रेच्या यज्ञातील घालून दिलेले समिधेचे तुकडे!यात्रेत औषधांची मोफत सोय करणाऱ्या सदानंद मेडेवार, लक्ष्मीकांत लोकमनवार यांच्या सेवेला शतशः वंदन!भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, आर्ट ऑफ लिव्हिंग, लायन्स क्लब, मारवाडी युवा मंच, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, पतंजली –या सर्व संघटनांनी निरोपासाठी उपस्थित राहून यात्रेच्या आध्यात्मिक महात्म्याला सामूहिक स्वरूप दिलं.
“निघता निघता भोलेमय झालं सगळं स्टेशन!”
बहुतेक सर्व यात्रेकरुना अमरनाथ नवखे होते. त्यांना सोडायला आलेले नातेवाईक चिंतेत होते, पण आमचा आनंद, आत्मविश्वास, आणि वातावरणातला उत्सव पाहून त्यांची भीती विरघळली. कोणी ढोलाच्या तालावर भांगडा करत होते, तर काहींनी कथयी टी-शर्टमध्ये सेल्फी आणि रील्सचा मोह टाळू शकले नाहीत! फुलांच्या हाराने गळा झाकला गेला आणि अकरा वाजता आम्ही ‘बाबा बर्फानी’च्या दिशेने रवाना झालो. दरवर्षी प्रमाणे चंद्रकांत अप्पाराव कदम यांनी नाश्ताची व्यवस्था केली होती त्याचा आस्वाद घेतला.
पूर्णा स्टेशनचा प्रेमळ थांबा
पूर्णा स्टेशनवर आमचे स्वागत पुन्हा एका मंगल प्रसंगासारखे झाले. भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अजयसिंह ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मसाला वडा आणि बिसलरी दिले.गाडी बरीच उशिरा आली तरी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
रेल्वेतील भक्तीगंगा, भजन, सेवा आणि सहवास
गाडी सुरू झाली आणि आम्ही नव्वद यात्रेकरू विविध बोग्यांमध्ये विभागलो गेलो B9 ते B12 पर्यंत.
जेवण-वाटपासाठी सुभाष देवकत्ते, जानकीलाल पटेल, माधव बामणे, राजेशसिंह ठाकूर, सुरेश शर्मा यांनी पुढाकार घेतला.यात्रा पर्ची व तिकिटे देण्यासाठी रामेश्वर वाघमारे व नारायण पांडे यांनी पुढाकार घेतला.
संध्याकाळी महिलांनी सुरुवात केली “हे भोळ्या शंकरा…”हळूहळू गर्दी वाढली…तीन कंपार्टमेंटमध्ये भजनाचा नाद भरून राहिला!पंजाबी यात्रेकरू सुद्धा सामील झाले, आणि “किती सांगू मी सांगू कुणाला” वर महिलांनी एकत्रित नृत्य केलं .क्षणभर वाटलं, रेल्वे नव्हे तर पर्वतराजाच्या पायथ्याशी भक्तिरस गाजतोय! रात्री खंडव्या स्थानकावर मनोज शर्मा नागपूर व अमोल गोळे अकोला यांनी सर्वांसाठी अत्यंत स्वादिष्ट भोजनाची तयारी केली होती. ताटात अन्न नव्हतं, त्याग होता, सेवा होती. दोन तास कधी गेले ते कळलं नाही…रात्री साडेदहाच्या सुमारास झोपेच्या अधीर वाऱ्यांत भोलेनाथाच्या स्वप्नांत हरवून गेलो… लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर