Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग २ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
"प्रवास मनाचा... भोलेनाथाच्या ओढीचा!"
आज तो दिवस उजाडला… ज्याची प्रतीक्षा अखंड तयारीनंतर अखेर संपली होती. पहाटे पाच वाजता डोळे उघडले. बाहेर अजूनही पन्हाळलेले आकाश, पण अंतर्मनात उत्साहाची ऊब. सामानाची एकदा पुन्हा नीटशी पाहणी केली. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट, रेल्वे तिकिटं आणि यात्रा परची, त्या माझ्या जवळच होत्या.कधी काळी एका कुटुंबाने यात्रा परची घरी विसरल्यामुळे दर्शनाच्या वेळेस आम्हाला अक्षरशः देव आठवले होते.त्या अनुभवाने शिकवले "भक्तीचा प्रवास जितका भावनिक, तितकाच संयमीही असतो."
प्रस्थानाची शुभ पहाट
प्रातःस्मरण झालं. अपेक्षेप्रमाणे आज मॉर्निंग वॉकला मी एकटाच होतो.नंतर घरात पूजन केलं, मनोमन देवाचा आशीर्वाद घेतला.गल्लीतील पुरातन सोन्या मारुती मंदिर आणि सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर इथं दर्शन घेऊन समर्थांपाशी एक साकडं घातलं “बाबा, यावर्षीची यात्रा सुद्धा तूच पूर्ण करून घे…” प्रत्...

