वाचक मित्रांनो…! अतिशय खडतर, थरारक व अध्यात्मिक रोमांच असलेली अमरनाथ यात्रा यंदाही नव्या जोमात सुरू होत आहे. नांदेड येथून सलग २५ व्या वर्षी, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर ९३ यात्रेकरूंसह बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत. काश्मीरमधील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, आणि अनपेक्षित अडथळ्यांवर मात करत घडणाऱ्या या यात्रेचा थरारक प्रवास, दिलीपभाऊंच्या ओघवत्या, प्रत्ययकारी शैलीतून रोजच्या अंकात साकारला जाणार आहे. त्यामुळे, आज पासून छापून येत असलेली “अमरनाथच्या गुहेतून” ही लेखमाला सेवा करून ठेवा! एकदा वाचल्यावर विसरणार नाही, असा हा अनुभव वाचकांच्या मनात खोलवर ठसे उमटवणार आहे – संपादक
शुद्ध बर्फाच्या कणांतून झळाळणारा देवाचा श्वास, अनंत हिमशिखरांतून उमटणारी ओंकाराची ध्वनी… याच निसर्गाच्या गोदेत वसलेली आहे बर्फानी बाबांची गुहा – अमरनाथ! आणि त्या दिशेने होणारी ही यात्रा म्हणजे केवळ पायी चालण्याची वाट नव्हे, ती आहे आत्म्याच्या अंतर्गत प्रवासाची! यंदा सलग 25 व्या वर्षी आम्ही पुन्हा सज्ज झालो होतो.सिल्वर ज्यूबली होत असल्यामुळे रोमांचित होत होतो.वृत्तपत्रं, सोशल मीडियावर घोषणा झळकल्या आणि अवघ्या सात दिवसांत यात्रेचा कोटा पूर्ण झाला!गेल्या वर्षी प्रमाणे माझा लहान भाऊ राजेशसिंह पुढे आला आणि साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर उचलल्या.या वर्षीच्या मेडिकल सर्टिफिकेट साठी सिव्हिल सर्जन डॉ.पेरके, त्यांचे स्वीय सहाय्यक शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे आणि सेवक शंकर यांनी अतुलनीय सहकार्य केले. पंजाब नॅशनल बँकेतील माझा मित्र शिवराज याने कनेक्टिव्हिटीच्या अडचणीतही चिकाटी सोडली नाही, आणि रजिस्ट्रेशनचा तो कठीण अध्याय अखेर पूर्णत्वास गेला.


यात्रेची पूर्वतयारी – मन आणि शरीर यांचा यज्ञ
ही यात्रा म्हणजे केवळ डोंगर चढण्याची तयारी नव्हे, ती आहे भक्तीने मन शुद्ध होण्याची प्रक्रिया. भारत भरातून लाखो भाविक दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात.पण अशी नियोजित, शिस्तबद्ध आणि श्रद्धापूर्वक तयारी संपूर्ण देशात केवळ नांदेडच्या अमरनाथ यात्री संघातच पाहायला मिळते असे अनेकजण आवर्जून सांगत असतात.सकाळी सहा वाजता श्रीराम सेतूवर जमणं, दोन-तीन फेऱ्या मारत सहा किलोमीटर वॉकिंग, त्यानंतर प्राणायाम – भसरिका, ओंकार लहरी, कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी…प्रत्येक श्वासात बर्फानी बाबाचे स्मरण, आणि प्रत्येक टाळीत भक्तीचा घोष. यानंतर सुरू होतो सेल्फ हिप्नोतिझम – स्वतःला दिलेल्या प्रेरणादायी सूचना, आणि मग टाळ्यांचा जोरदार गजर…हसत-हसत नवे बंध तयार होतात.कोणी गाणं तर कोणी भजन म्हणतो, एखादा विनोद सांगतो, मीही रोज एक मजेशीर किस्सा सांगतो.

हे हास्यच यात्रेच्या आधीचे मानसिक बल बनते!
काहीजण म्हणतात, “आम्ही आमच्या घराजवळ चालतो.”माझं त्यांना एकच म्हणणं – एकदा या, आणि नंतर ‘नियमित ’ कधी झालात ते कळणारही नाही. इथं येणाऱ्यांमध्ये एक वेगळीच ऊब असते. संवादातून आपुलकी निर्माण होते, आणि ‘भक्तांचा परिवार’ तयार होतो.योग दिन, चालण्याच्या स्पर्धा, रत्नेश्वरी पावसाची दिंडी या साऱ्या गोष्टी एकमेकांच्या सहवासात चैतन्य निर्माण करतात.प्रत्येक पावलांतून बाबांच्या चरणाशी जवळ जाण्याची अनुभूती येते.नंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे रेल्वे तिकिटे काढणे ही भक्तीची दुसरीच परीक्षा ! आधी 120 दिवसापूर्वी तिकीटे आरक्षित करता येत होती. आता नियमात बदल झाल्यामुळे 60 दिवस आधी तिकिटाचा कोटा उघडतो.या मुळे आमच्या सारखे जी पूर्वनियोजन करतात त्यांचे नुकसान होत आहे. आता कोटा ओपन झाला की अर्धा तासात संपतो. त्यामुळे अतिशय दक्ष रहावे लागते. वेटिंग लागलं की ब्रेक जर्नी, मग तात्काळ, त्यानंतर कोट्यांमधून शोधाशोध…विमानाने येणाऱ्या यात्रेकरूंनाही योग्य मार्गदर्शन हवे – आणि या साऱ्यासाठी दिवस कधी संपतात, ते जाणवतही नाही.

अन्नदान – यात्रेतील पवित्र अर्पण
या यात्रेत कोणत्याही यात्रेकरूकडून भोजनासाठी एक रुपयाही शुल्क घेतला जात नाही.भक्तांनी भक्तांसाठी सुरू केलेली ही व्यवस्था म्हणजेच खऱ्या अर्थाने अन्नयज्ञ! यावर्षी अन्नदानासाठी पुढाकार घेतलेले माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण साहेब, खा. डॉ. अजित गोपछडे साहेब ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सतीश सुगनचंदजी शर्मा. सुभाष बंग,श्याम हुरणे, डॉ. अजयसिंह ठाकूर, द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल,ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सुभाष बंग ,सरदार जागीरसिंह अमृतसर,हास्य कवी प्रताप फौंजदार, दत्ता खानजोडे, प्रदीप शुक्ला भोपाळ, चंद्रकांत अप्पाराव कदम, भुसावळचे ऍड.निर्मल दायमा,बापू कदम व संभाजीनगरच्या कृष्णा कदम, या सेवाभावी व्यक्तींनी. यांच्या हातून अन्न नव्हे तर श्रद्धा वाटली गेली.दरवर्षी प्रमाणे सदानंद मेडेवार यांच्या पुढाकारातून केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनेने अलोपॅथी मेडिसिन चा पुरवठा केला. लक्ष्मीकांत लोकमनवार यांनी आयुर्वेदिक औषधी दिल्या.

नियोजन, सौंदर्य आणि सजावट – भक्तीला साजेसे रूप
24 वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याची धडपड असते.हॉटेल चालक, बसवाले, स्थानिक यांच्याशी सुसंवादाने आता जवळीकच झाली आहे.यंदा मरून कलरचे टी-शर्ट, रेनकोट, कॅप्स देण्यात आले.बसमधील आसन व्यवस्था, आयकार्ड, ट्रॉफी, बॅनर, ही सर्व ‘छोटी’ वाटणारी कामं एकत्रित केली तर एक भव्य सोहळा तयार होतो.सर्व तिकीटं, यात्रा परच्यांची एकदा पुन्हा खातरजमा केली… आणि आता, उद्या शुक्रवार – पहाटे पहिलं पाऊल बर्फानी बाबांच्या दिशेने पडणार ! त्या रात्री झोपेच्या अधीन होताना एकच विचार मनात घोळत होता – “बाबांचे दर्शन मिळेल, हा थकवा सारा निवेल…” (क्रमशः) (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)