श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वन्य प्राण्याच्या शिखारीत वाढ झाली असून दिवसा ढवळ्या माहूर शहरात गावठी बाॅम्ब लावून डुक्कराची शिखार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. घडलेल्या या घटनेमुळे माहूर वन विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे डुक्कराच्या शिखारीस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या अधिकार्यावर कोणती कारवाई वरिष्ठ कार्यालयाकडून होते, याची चर्चा सुरू झाली आहे.
माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात वन विभागाचे राखीव जंगल आहे. जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांच्या शिकारीमध्ये आता हळूहळू वाढ होत आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी टोळ्या सक्रिय झाल्या असून हरीण, ससा, घोरपड, रोही ,राणठी डुक्कर आदी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री केल्या जात असल्याचे समजते आहे. परंतु, याबाबत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेत असल्याने वन्यजीव संरक्षण कायदा वार्यावर सोडला गेला म्हणण्याची वेळ आली आहे.
माहूरगड हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी वनविभागाचे कार्यालय असून नसल्याच्या सदरात असल्याने वन्य प्राण्यांची शिकार करणारे चांगलेच फावले आहे. याकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच लक्ष देऊन वाढत्या वन्य प्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्याची मागणी तालुक्यातील वन्यजीव व वनप्रेमी नागरिकांतून करण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र आहे. येथे मोठ मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु वाढत्या शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, हळूहळू ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी प्रमुख कारणांसह जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्यात येत असलेला प्राण्यांचा निवारा आदी कारणांमुळे जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना धोका निर्माण होऊ लागला आहे.आज माहूर शहरात दिवसा ढवळ्या गावठी बाॅम्बने डुक्कराची शिखार केल्याचे उघडकीस आले आहे.याला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना उपस्थित करत आहे.
माहूर वन विभाग क्षेञात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांची हत्या शिकारी करत आहेत. हिंस्र प्राण्यांना अन्नाचा तुटवडा होत आहे. बेसुमार वृक्षतोड शिवाय पाण्याचे स्त्रोत संपुष्टात येत असल्याने व मानवाचे जंगलात वास्तव्य वाढल्याने वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. वन विभागाने स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून डोंगर पठार आदी ठिकाणी जलस्रोत, वृक्षसंवर्धन व लागवड यावर भर देणे गरजेचे आहे.
येथील कार्यालयाचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार बनला असून अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांशी उद्धटपणेच वागत असल्याचे अनेक प्रकार अनेकदा घडले आहे.वन्य प्राण्याकडून पिकाची नासाडी झालेल्या शेतकर्यांना व पाळीव प्राण्यावर झालेल्या हल्याच्या संदर्भात माहिती सांगण्यास गेलेल्या नूकसान ग्रस्त नागरिकांना उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याने आता पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना तसेच ग्रामिण भागातील जनता आता संतप्त झाले आहेत.