नवीन नांदेड | शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथील तिर्थक्षेत्र श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिराच्या विविध विकास कामांकरीता नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, त्यामुळे तिर्थक्षेत्राचे विश्वस्त व समाज बांधवांतून आ. मोहनअण्णा हंबर्डे यांचे अभिनंदन होत आहे.


शिख बांधवांचे दहावे गुरु, गुरुजी श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत तसेच गोदावरी मातेचे वरदान लाभलेल्या नांदेड नगरीत जगातील पवित्र ग्रंथ आदि गुरुग्रंथ साहिबजी यांच्या केवळ अस्सिम कृपेने व प्रेरणेने, महाराष्ट्रातून प्रथमतः नांदेड नगरीलगत बळीरामपूर या ग्रामीण भागात महामानव श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट बळीरामपूर नांदेडची रितसर नोंदणी मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड येथील कार्यालयात दि. 15 डिसेंबर 1983 रोजी करण्यात आली आहे.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ. मोहनअण्णा हंबर्डे हे मोठेभाऊ श्री काळेश्वर तिर्थक्षेत्राच्या रुपाने तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड या छोट्या भावाच्या मदतीला विकासाच्या स्वरुपात धावून येऊन 25 लाख रुपयाची तरतुद विकास कामास्तव उपलब्ध करुन दिल्याची भावना विश्वस्त व चर्मकार समाज बांधवांतून व्यक्त होत आहे.

हा निधी उपलब्ध करुन देण्याकामी मराठवाड्याचे लोकनेते मा.खा. भास्करराव पाटील खतगांवकर व सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन यांनीही विशेष प्रयत्न केले असून त्यांनी अत्यंत पोटतिडकेपणा दाखविल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असल्याचे समस्त चर्मकार बांधव, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने सांगितले जात आहे. त्यानिमित्त त्यांचे वरील सर्व भाविक- भक्तांतून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. गुरु रविदास भक्तगण प्रेमी जणांकडून सदरील उपलब्ध झालेल्या निधीतून तिर्थक्षेत्राची कामे उच्च दर्जाची व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
