हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे पार्डी येथे दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात विजेच्या कडकडाटामुळे शेतकरी महिला विशाखा सचिन येलकेवाड वय 30 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बुधवारी पार्डी येथे जाऊन मयत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखद प्रसंगी शासनाची आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदारांनी हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मयताच्या कुटुंबीयांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी प्रताप देशमुख सरसमकर, राजू पाटील सील्लोडकर यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते व मयत महिलेचे नातेवाईक उपस्थित होते.



अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका आणि शेतकरी कुटुंबांवर ओढवणारी संकटे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत. परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


